- रशिद शेख (औंध, जि. सातारा)
बाजारपेठेचा अभ्यास, शेतीकडे लक्ष आणि जिद्द असेल, तर एखादा शेतकरी अल्पशा जमिनीतूनही लाखो रुपयांचे उत्पन्न घेऊ शकतो. असेच उदाहरण घालून दिले आहे ते खटाव तालुक्यातील औंध येथील उमेश जगदाळे या युवा शेतकऱ्याने. त्यांनी एकरभर शेतीक्षेत्रात विक्रमी आल्याचे (अद्रक) उत्पादन घेतले आहे. या उत्पादित आल्याला सध्याच्या बाजारभावाने १५ लाख रुपये मिळाले आहेत. दुष्काळी तालुक्यात काढलेल्या या विक्रमी उत्पादनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सातारा जिल्ह्यातील औंध येथील उमेश गोविंद जगदाळे हे शिक्षण घेऊनही नोकरी न लागल्याने शेती व्यवसायाकडे वळले. उमेश व रमेश जगदाळे या दोन्ही बंधूंना प्रगतशील शेतीचा सुरुवातीपासूनच ध्यास आहे. येथील दुष्काळी भागात बटाटा हे पीक प्रमुख नगदी पीक मानले जाते; परंतु उमेश जगदाळे यांनी आले पिकाची निवड केली. मे २०१७ मध्ये त्यांनी आल्याची शास्त्रोक्त पद्धतीने लागवड केली. त्याअगोदर त्यांनी आपल्या एका एकरात तब्बल दहा ट्रॉली शेणखत टाकले. त्यानंतर वेळच्या वेळी लक्ष देऊन पिकाची निगा राखली. आवश्यक खते, कीटकनाशके, भर टाकणे आदी मशागतीची कामे त्यांनी वेळेत केली.
आले पिकाची त्यांनी तब्बल १७ महिने संपूर्ण काळजी घेतली. आल्याचे हे पीक ठिबकद्वारे भिजवले, त्यासाठी बेड पद्धतीचा अवलंब केला. या पिकास १ लाख रुपये खर्च आला असून, विक्रीतून १५ लाख रुपये मिळाले आहेत. त्यामुळे शेती कशी फायदेशीर करावी, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. शेणखत व फवारणीत गोमूत्राचा वापर करण्यात आला होता. इंटरनेट तसेच चर्चासत्रातून ज्ञान वाढवले. व्यापाऱ्यांनी जागेवरच विक्री केल्यामुळे वाहतूक, कमिशन, अडत, हमाली आदी खर्च वाचला आहे, त्यामुळे त्यांच्या हातात चांगले पैसे आले आहेत.
गेल्या आठ वर्षांपासून शेती करणारे जगदाळे कुटुंबीय हे नेहमी कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेणारे औंध भागातील शेतकरी आहेत. यापूर्वीही त्यांनी कांदा, मेथी, बटाटा आणि वांग्याचे परिसरात एक नंबरचे उत्पादन घेतले होते. उमेश जगदाळे हे जास्तीत-जास्त शेणखत व गरजेपुरते रासायनिक खतांचा वापर करून आपल्या प्रत्येक पिकाचे उत्पादन दर्जेदार कसे राहील याकडे बारकाईने लक्ष देतात.
या भागातील अनेक छोटे-मोठे शेतकरी जगदाळे यांचे मार्गदर्शन घेत असतात. कोणतीही शेतीविषयक पदवी नसताना फक्त अनुभव व उत्कृष्ट नियोजन या जोरावर उमेश जगदाळे हे नेहमी भरघोष उत्पन्न मिळविण्यात यशस्वी होत आहे. एखाद्या पिकाची लागवडीसाठी निवड करताना, मी त्याचा खर्च, वेळ, बाजारातील परिस्थिती काय आहे याचा विचार करीत असतो. आपले पीक दर्जेदार व उत्तम येण्यासाठी काय करावे, याचे नियोजन डोक्यात ठेवणे आवश्यक आहे. दुष्काळ असल्याने कमी पाण्यात उत्पन्न घेण्यासाठी प्रयत्न करावेत, असे उमेश जगदाळे यांनी सांगितले.