सातारा : घुबड व मांडूळाची तस्करी करून कृष्णानगर परिसरात विक्रीसाठी आलेल्या अनिकेत शंकर यादव (वय २२,रा. कृष्णानगर वसाहत, सातारा) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून घुबड, मांडूळ असे दहा लाख रुपये किंमतीचे वन्यजीव पोलिसांनी हस्तगत केले. त्यानंतर त्याला पुढील तपासासाठी वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.याबाबत अधिक माहिती अशी, ३ फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे फौजदार प्रसन्न जऱ्हाड हे कर्मचाऱ्यांसवेत सातारा ते कोरेगाव रस्त्यावर गस्त घालत होते. त्यावेळी कृष्णानगर इरिगेशन वसाहतीजवळ अनिकेत यादव त्यांच्या निदर्शनास आला.
जऱ्हाड यांनी त्याला बोलावून घेतले असता, तो पळून गेला. त्यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग करून पकडले. त्याच्याकडील पिशवीची झडती घेतली त्यावेळी त्यात एक सर्प व घुबड पोलिसांना सापडले. याबाबत त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता ते दोन्ही वन्यजीव काळ्याबाजारात विक्रीसाठी आणल्याची त्याने कबुली दिली.
काही दिवसांपूर्वी त्याने स्वत:च्या घराच्या परिसरात मांडूळ पकडले होते. तर घुबड हे त्याने गावाकडे पकडले होते. या दोन्हींची विक्री करून बक्कळ पैसे कमविण्याचा त्याचा बेत होता. पोलिसांनी वन विभागाशी संपर्क साधून यादव याला पुढील चौकशीसाठी वन विभागाच्या ताब्यात दिले आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर अधीक्षक धीरज पाटील, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार प्रसन्न जऱ्हाड, हवालदार तानाजी माने, संतोष पवार, मुबीन मुलाणी, विजय कांबळे, शरद बेबले, नितीन गोगावले, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, मुनिर मुल्ला, अजित कर्णे, निलेश काटकर, विशाल पवार, विक्रम पिसाळ, संजय जाधव, संजय सावंत यांनी ही कारवाई केली.