सातारा : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तरुण आणि तरुणीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना शहरापासून जवळच असलेल्या जकातवाडी अन् डबेवाडी येथे घडली. या भटक्या कुत्र्यांनी माणसांचे आणि जनावरांचे लचके तोडतच धुमाकूळ घातला. यात पाच नागरिक जखमी झाले असून, एका रेडकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे दोन्ही गावांत भटक्या कुत्र्यांची प्रचंड दहशत पसरली असून, ग्रामस्थ अक्षरश: भयभीत झाले आहेत.
देवानंद गोरखनाथ लोंढे (वय २३, रा. जकातवाडी, ता. सातारा), रूपाली बबन माने (२१, रा. डबेवाडी, ता. सातारा) अशी भटक्या कुत्र्याच्या चाव्याने मृत्युमुखी पडलेल्या तरुण आणि तरुणीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, देवानंद लोंढे हा २२ डिसेंबर २०२० रोजी गुरे चारण्यासाठी शेतात गेला होता. त्यावेळी त्याच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढविला. देवानंद हा तब्बेतीने अत्यंत सुदृढ होता. मात्र, तरीही भटक्या कुत्र्याने उडी घेऊन त्याच्या कानाचा आणि मानेचा चावा घेतला. त्यानंतर भटकी कुत्री जकातवाडीत आली. पाच नागरिक, एक गाय, रेडकू आणि बैलाचा भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्यानंतर हीच कुत्री पुढे डबेवाडीत गेली. दुसऱ्यादिवशी म्हणजे २३ डिसेंबरला सकाळी साडेसात वाजता रूपाली माने ही तरुणी एसटीने कॉलेजला जाण्यासाठी घरातून बाहेर पडली. रस्त्यावर आल्यानंतर अचानक कुत्र्याने तिच्या तोंडावर हल्ला केला. कपाळाच्या मधोमध कुत्र्याने चावा घेतल्याने ती रक्तबंबाळ झाली. दरम्यान, देवानंद आणि रूपालीला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, चार दिवसांनंतर पुन्हा दोघांनाही अधिक त्रास जाणवू लागल्याने त्यांना पुणे येथे पुढील उपचारासाठी नेण्यात आले
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अशाप्रकारे तरुण, तरुणीचा मृत्यू झाल्याने दोन्ही गावातील लोक अक्षरश: हादरून गेले आहेत. ही घटना महिन्याभरापूर्वी घडली असली, तरी अद्यापही या कुत्र्यांची दहशत गावात आहे. या गावांच्या शेजारी सताऱ्याचा कचरा डेपो आहे. या डेपोवर भटक्या कुत्र्यांचा नेहमी वावर असतो. शिळे अन्न व काही विषारी द्रव कुत्र्यांनी सेवन केले असावे, त्यामुळेच कुत्री पिसळली गेली. भटक्या कुत्र्यांचे टोळके दोन्ही गावच्या परिसरातून फिरत असल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.
फोटो: २३ रूपाली माने
२३ देवानंद लोंढे