वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक पादचाऱ्यांना धडक दिल्यानंतर दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार धीरज राजेंद्र साळुंखे हा महाविद्यालयीन तरुण ठार झाला, तर एक पादचारी गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात बुधवारी (दि. २९) रात्री झाला. धीरज साळुंखे (वय १७) हा पिंपोडे बुद्रुकच्या उत्तरेला असलेल्या केंजळे वस्तीवर राहतो. बुधवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या. दरम्यान, दूध घालण्यासाठी दुचाकीवरून धीरज गावातील दूध डेअरीवर आला. दूध घातल्यावर पावसामुळे तो गडबडीने घराच्या दिशेने निघाला होता. त्याचवेळी अशोक साळुंखे व विश्वास साळुंखे हे दोघे गावातील बेंदूर सणासाठी काढलेली बैलांची मिरवणूक संपवून वस्तीकडे चालत निघाले होते. दोघेही धीरजच्या घरापासून शंभर मीटर अंतरावर आले असता धीरजच्या दुचाकीची अशोक साळुंखे यांना जोरदार धडक बसली. यामध्ये धीरज, अशोक रस्त्यावर फेकले गेले. दोघांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. धीरजला उपचारासाठी गावातीलच रुग्णालयात नेले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. अशोक साळुंखे यांच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. धीरज बारावीत शिकत असून, चार महिन्यांपासून महाविद्यालय सुटल्यानंतर तो गॅरेजमध्ये काम करत होता. (प्रतिनिधी)
दुचाकी अपघातात पिंपोडेत तरुण ठार; एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2015 1:03 AM