नागठाणे : मुलाला जिवे मारण्याची धमकी देत दहा लाखांची खंडणी मागणाऱ्या नागठाणे येथील युवकाला बोरगाव पोलिसांनी पाठलाग करून पकडले. लक्ष्मण गणपत साळुंखे असे पकडण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोरगावचे सहायक पोलिस निरीक्षक एन. आर. चौखंडे यांना एक व्यक्ती महामार्गावरील माजगाव फाटा येथे खंडणी घेण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी शनिवारी रात्री दहाच्या सुमारास माझगाव फाटा येथे सापळा लावला. त्यावेळी तेथे तोंडाला रूमाल बांधलेला व दुचाकीच्या नंबरप्लेटवर काळ्या रंगाची चिकटपट्टी लावलेला संशयित युवक आढळून आला. या युवकाने पोलिसांना पाहताक्षणी नागठाण्याच्या दिशेने पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून नागठाणे प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ त्याला पकडले. चौकशीनंतर त्याने लक्ष्मण साळुंखे असे नाव सांगितले. ‘नागठाणे येथील अजित सदाशिव साळुंखे यांना काही दिवसांपूर्वी निनावी चिठ्ठीद्वारे दहा लाखांची खंडणी मागितली, ती न दिल्यास त्यांच्या मुलास जिवे मारण्याची धमकी दिली होती,’ असे त्याने पोलिसांसमोर कबूल केले. सहायक पोलिस निरीक्षक एन. आर. चौखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार डी. जी. शिंदे अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)
खंडणी मागणारा युवक गजाआड
By admin | Published: September 26, 2016 12:05 AM