सातारा : घरात एकटी असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी मयूर सुधीर मोरे (वय १९, रा. साखरवाडी, ता. फलटण) याला जिल्हा न्यायाधीश-२ एन.एल. मोरे यांनी तीन महिने सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड, दंड न दिल्यास १५ दिवस साधी कैद, अशी शिक्षा सुनावली.
या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी, फलटण तालुक्यातील एका गावामध्ये ६ फेब्रुवारी २०१९ रोजी हा प्रकार घडला. पीडित अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना आरोपी मयूर याने मुलीशी गैरप्रकार केला. त्यानंतर तो तेथून पळून गेला होता. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात मयूर मोरेच्या विरोधात विनयभंग व पोक्सोतंर्गत गुन्हा दाखल झाला होता. सहायक पोलीस निरीक्षक एस. के. शिंगटे यांनी मयूरला अटक केली. त्यानंतर तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य मानून न्यायालयाने मयूर मोरे याला तीन महिने सश्रम कारावासची शिक्षा सुनावली.
सहायक सरकारी वकील महेश शिंदे यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. त्यांना पोलीस कॉन्स्टेबल एम. आर. शेख यांनी सहकार्य केले.