सातारा : एका ३० वर्षीय अंध महिलेला आंधळी-आंधळी असे चिडवणं एका युवकाच्या चांगलाच अंगलट आलंय. संबंधित युवकावर पोलिसांनी वेगवेगळ्या कलमांद्वारे गुन्हा नोंद केला असून, त्याला अटक करण्यासाठी पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ही घटना साताऱ्यातील सदर बझार परिसरातील लक्ष्मीटेकडी येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संबंधित तीस वर्षीय महिला पूर्णपणे अंध आहे. या महिलेला लखन भानुदास जाधव (वय ३१, रा. पिरवाडी, ता. सातारा) हा आंधळी-आंधळी म्हणून चिडवत होता. ही आंधळी माझी आजी राहत असलेल्या जागेत राहात आहे, असे म्हणत होता. सरतेशेवटी संबंधित अंध महिलेने हा प्रकार तिच्या भाऊ व बहिणीला सांगितला. हे दोघे जाब विचारण्यासाठी आले असता लखनने अंध महिलेच्या पोटात लाथ मारली. त्यानंतर या महिलेचे पती हा वाद सोडविण्यासाठी आले असता त्यांनाही त्याने ढकलून दिले. तुला व तुझ्या नवऱ्याला जिवंत सोडणार नाही. आंधळे तुला व तुझ्या कुटुंबाला बघून घेतो, अशी धमकी दिली. या प्रकाराची तक्रार देण्यासाठी संबंधित अंध महिला सातारा शहर पोलीस ठाण्यात गेल्याचे त्याला समजले. त्यामुळे त्याने दि. १८ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास अंध महिलेच्या घरात जाऊन महिलेचा डावा हात पिरगळून कशाला पोलीस ठाण्यात गेली होतीस, तुझी लायकी आहे का, असे म्हणून त्या महिलेला त्याने अपमानित केले. पोलिसांनी यामुळे लखन जाधववर गुन्हा दाखल केला आहे.