सातारा : अबुधाबीवरून आलेल्या एका तीस वर्षीय युवकाला खोकला, ताप आणि छातीत दुखत असल्यामुळे त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली त्याला ठेवण्यात आले असून, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी केले आहे.सातारा जिल्ह्यातील रहिवाशी असणारा संबंधित तीस वर्षीय तरूण दोन दिवसांपूर्वी अबुधाबीवरून मुंबईत आला. तेथे एक दिवस राहिल्यानंतर तो गावी आला. त्यावेळी त्याला खोकला, ताप आणि छातीत दुखण्याचा त्रास जाणवू लागला. या प्रकाराची माहिती त्याच्या घरातल्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाला दिली.त्यानंतर पथकाने संबंधित युवकाला तत्काळ रुग्णालयात घेऊन येण्याचा सल्ला दिला. संबंधित रुग्णाला मध्यरात्री जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या युवकाचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्याला कशामुळे त्रास होतोय, हे स्पष्ट होणार आहे.दरम्यान, सातारा जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत परदेशातून १८ जण आले आहेत. यामध्ये केवळ एकाच रुग्णाला त्रास होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. तथापि कोणीही घाबरून जावू नये, जिल्हा प्रशासन पूर्णपणे दक्ष आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.कोरोनाची अफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हाखटाव तालुक्यातील पुसेगाव येथे कोरोनाचे दोन रुग्ण आढळले, अशी खोटी बातमी तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या अज्ञाताच्या विरोधात पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एका खासगी वृत्तवाहिनीचा लोगो वापरुन खटाव तालुक्यात कोरोनाचा शिरकाव, पुसेगाव परिसरात दोन रुग्ण आढळले, अशा आशयाची बनावट बातमी तयार करुन व्हायरल करण्यात आली होती. अशी अफवा पसरविणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी दिली.
corona virus-अबुधाबीवरून आलेला युवक वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 12:14 PM
अबुधाबीवरून आलेल्या एका तीस वर्षीय युवकाला खोकला, ताप आणि छातीत दुखत असल्यामुळे त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली त्याला ठेवण्यात आले असून, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी केले आहे.
ठळक मुद्देअबुधाबीवरून आलेला युवक वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखालीविलगीकरण कक्षात दाखल