पेट्री : कोरोनामुळे उद्योगधंद्यांना मोठा फटका बसला असून. शाश्वत अशा शेती व्यवसायाशिवाय तरणोपाय नाही. याचा विचार करून तरूणांनी शेती करतच त्याला कृषी पर्यटनाची जोड दिल्यास आर्थिक उन्नती साधता येईल, असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी केले.
जावली तालुक्यातील सह्यगिरी कृषी पर्यटन केंद्र्राला भेट देऊन मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आपल्या मार्गदर्शनात पुढे म्हणाले, जावली तालुक्याला निसर्गाचे वरदान लाभले आहे. तालुक्यात कास पठार, बामणोली, वासोटा किल्ला व विविध धार्मिक स्थळांमुळे पर्यटनाला मोठा वाव आहे. लाखो पर्यटक दरवर्षी या परिसरात येत असतात. शिवाय महाबळेश्वर, पाचगणी जवळच असल्याने येथील पर्यटकही आकर्षित करता येतील. याचा विचार करून शेतीमधे नवीन कल्पना राबवून शेतीला जोडधंदा म्हणून पर्यटनाची जोड दिली पाहिजे. यातून रोजगार निर्मिती होण्याबरोबरच तरूणांना शहराची वाट धरावी लागणार नाही.
जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत कृषी पर्यटन व्यवसायासाठी कर्ज पुरवठा करण्यात येत असून, जावली तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सह्यगिरी कृषी पर्यटन केंद्रामार्फत संचालिका अर्चना पवार यांनी राजेंद्र सरकाळे व उपस्थितांचे स्वागत केले. डॉ.सरकाळे यांनी केंद्राची पाहणी करून समाधान व्यक्त केले.