तांबवे : पश्चिम सुपने, ता. कऱ्हाड येथील जवान विनोद गायकवाड यांच्यावर मंगळवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दिल्लीजवळील गुरगावच्या मानेसर परिसरात रविवारी त्यांचा अपघात झाला होता. त्यामध्ये जखमी झाल्यानंतर उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.पश्चिम सुपने येथील विनोद गायकवाड हे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात सेवेमध्ये होते. सध्या त्यांची दिल्ली येथे एनएसजीच्या विशेष कमांडो पथकात नेमणूक होती. सुमारे पंधरा दिवसांपूर्वी विनोद यांचा धाकटा भाऊ विशाल याचा विवाह समारंभ होता. या विवाहासाठी विनोद गावी आले होते. समारंभ आटोपल्यानंतर आठच दिवसांपूर्वी ते पुन्हा सेवेत रूजू झाले. रविवार, दि. १ रोजी सकाळी विनोद यांचा दुचाकीवर अपघात झाला. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. उपचारार्थ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान सोमवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव मंगळवारी त्यांच्या गावी पश्चिम सुपने येथे दुपारी बाराच्या सुमारास सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांमार्फत आणण्यात आले. ट्रॅक्टरमधून त्यांचे पार्थिव त्यांच्या घरी नेण्यात येत होते. त्यावेळी विठ्ठल गणोजी माने विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह आबालवृद्धांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून फुलांचा वर्षाव करत ‘विनोद गायकवाड अमर रहे’ अशा घोषणा दिल्या. त्या घोषणांनी सारा परिसर शोकाकुल झाला. प्रकाश पाटील, प्रदीप पाटील, महेंद्र पाटील, साहेबराव गायकवाड, उपसरपंच प्रवीण थोरात, शंकरराव थोरात यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर लष्करी जवान आणि पोलिस दलाच्या वतीने बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. (वार्ताहर)कुटुंबीयांच्या आक्रोशाने पानावले डोळे...पार्थिव घरामध्ये आणल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांसह नातेवाइकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. तेथून पुन्हा पार्थिव स्मशानभूमीत नेण्यात आले. पार्थिवास आमदार शंभूराज देसाई, तहसीलदार राजेंद्र्र शेळके, तालुका पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, अॅड. उदयसिंह पाटील, सत्यजितसिंह पाटणकर, सारंग पाटील, सीआयएसएफचे जवान, कमांडो, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे अधिकारी, सैन्य दलासह पोलिस दलातील अधिकारी, ग्रामस्थांनी पुष्पचक्र अर्पण केले.
जवान विनोद गायकवाड अनंतात विलीन
By admin | Published: January 03, 2017 11:23 PM