सातारा : एकीव येथील धबधब्यात पाय घसरून पडल्याने श्वेता मुकुंद साठे (वय १८, रा.गोडोली, सातारा) ही युवती गंभीर जखमी झाली आहे.
साताऱ्यातील ५ मैत्रिणी शनिवारी एकीव येथील धबधबा पाहण्यासाठी गेल्या होत्या. धबधब्यातून पडणाऱ्या पाण्याचा आनंद घेत असताना, श्वेता साठे ही युवती निसरड्या दगडावरून पाय घसरून धबधब्यात कोसळली. ४० फूट खोल असलेल्या दगडावर ती आदळल्याने गंभीर जखमी झाली. दुपारी २ वाजता ही घटना घडली. आपली मैत्रीण धबधब्यात पडल्याने सोबत असलेल्या युवतींनी आरडाओरडा केला. त्यानंतर, स्थानिक लोक गोळा झाले. त्यांनी जखमी युवतीला धबधब्यातून बाहेर काढले.
या घटनेची नोंद मेढा पोलीस ठाण्यात झाली असून, जखमी युवतीवर साताऱ्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. साताऱ्याच्या पश्चिम भागात असणाऱ्या सर्वच धबधब्यांच्या ठिकाणी गर्दी होऊ लागलेली आहे. कास, ठोसेघर, महाबळेश्वर परिसरातील धबधबे पाहण्यासाठी मोठी गर्दी होते. या ठिकाणी सावधानता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.