प्रमोद सुकरे -सुकरे -सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक १७ मार्चला होत आहे. आज (बुधवारी) येथील निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्जांची छाननी होती. गेले दोन दिवस सर्वच नेत्यांनी छाननीची जोरदार तयारी चालवलेली. त्यामुळे बुधवारी कायद्याच्या पुस्तकांचा खिस निघणार अन् वकिलांच्यात खडाजंगी होणार, असे अपेक्षित होते; पण प्रत्यक्षात सर्वच नेत्यांनी ‘नो आॅब्जेक्शन’ म्हणत कानावर हात ठेवल्याने ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ची सध्या चर्चा सुरू आहे. सह्याद्री कारखान्याच्या इतिहासात प्रथमच २२४ उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहेत. निवडणूक दुरंगी, तिरंगी की चौरंगी होणार, हे अद्याप समजेना झालंय. काही महिन्यांपूर्वी विधानसभेसाठी तापलेले राजकीय वातावरण अजून ‘थंड’ झालेलं नाही. त्यामुळेच कारखान्याच्या आखाड्यातही अनेकांनी ‘दंड’ थोपटल्याचे दिसते; पण यातील कोण-कोण निवडणुकीपूर्वीच ‘थंड’ होणार अन् कोण-कोण ‘बंड’ करणार, यासाठी थोडे थांबावेच लागेल. बुधवारी झालेली छाननी एकदम ‘छान’च झाली. कुणी कुणावर हरकतच घेतली नाही. फक्त तांत्रिक मुद्द्यावर दोन अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनीच बाजूला काढले, एवढेच! पहिल्या गटाच्या छाननीवेळीच आमदार बाळासाहेब पाटील व धैर्यशील कदम यांनी आमच्या कोणावर हरकती नसल्याचे सांगून टाकले अन् अवघ्या काही मिनिटांतच छाननीचे सोपस्कार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पूर्ण केले. मात्र, नेत्यांच्या या ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’च्या भूमिकेबद्दल सभासद कार्यकर्त्यांच्यात सध्या जोरदार उलट-सुलट चर्चा सुरू आहे.कारखान्याच्या गत दोन निवडणुका बिनविरोध करण्यात यशस्वी ठरलेल्या आमदार बाळासाहेब पाटलांना यंदा मात्र निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे; पण विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून त्यांनी त्याची तयारी चालवली आहे. तर दुसरीकडे त्यांचे प्रमुख विरोधक ‘मनोधैर्य’ एकवटून विधानसभेचा वचपा काढण्याची भाषा करत आहेत. दक्षिणेतील एका धुरंधर नेतृत्वाचीही त्यांना छुपी साथ मिळत असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची अन् दोघांनाही सोपी वाटत आहे. त्यामुळे उमेदवारी अर्जांवर हरकती घेण्यापेक्षा एकमेकांच्या कामावरच प्रचारात हरकती घ्याव्यात, असे त्यांनी निश्चित केले असावे. परिणामी प्रचारादरम्यान यापुढील काळात आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यास आश्चर्य वाटायला नको. आता निर्णय मतदारांच्या हातातउमेदवारी अर्जाची छाननी हा निवडणुकीतील महत्त्वाचा भाग मानला जातो. आपला उमेदवारी अर्ज बाद तर होणार नाही ना? त्याच्यावर कोणी हरकत तर घेणार नाही ना, याची धकधक प्रत्येक उमेदवाराच्या मनात असतेच; पण ‘सह्याद्री’ची छाननी चांगली झाल्याने आता एक टप्पा पूर्ण झाला असून, अर्ज मागे घेण्याची मुदत संपताच उमदेवारांचे भविष्य मतदारांच्या हातातच उरणार आहे. ‘नो आॅब्जेक्शन’ की ‘नो प्रॉब्लेम’ ! उमेदवारी अर्जाबाबत छाननीत नेत्यांनी ‘नो आॅबजेक्शन’चा सिग्नल दिला. त्यामुळे त्यांना निवडणुकीतही ‘नो प्रॉब्लेम’ असेच सांगायचे असावे. सत्ताधाऱ्यांना ही निवडणूक सोपी वाटत असावी तर विरोधकांच्या डोक्यातही काही राजकीय खेळी असावी. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून कोणीही रिंगणात आले तरी त्यांना ‘प्रॉब्लेम’ वाटत नसावा, असेच आजचे चित्र दिसत आहे.
तेरी भी चूप ... मेरी भी चूप !
By admin | Published: February 18, 2015 10:46 PM