७९ आपले सरकार सेवा केंद्रे बंद करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरेगाव : खासगी कंपनीद्वारे कोरेगाव तालुक्यातील १४२ गावांसाठी ग्रामपंचायतींमार्फत चालविण्यात येणाऱ्या ७५ आपले सरकार सेवा केंद्रांच्या वतीने केवळ वर्गणीच्या नावाखाली पैसे जमा केले जात आहेत. त्यातून आवश्यक सोयी-सुविधा दिल्या जात नाहीत. त्यामुळे ही केंद्रे रद्द करावीत आणि ग्रामपंचायतींमार्फत स्वतंत्रपणे केंद्रे सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव पंचायत समितीत एकमताने मंजूर करण्यात आला.
कोरेगाव पंचायत समितीची मासिक सभा बुधवारी सभापती राजाभाऊ जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली व उपसभापती संजय साळुंखे, गटविकास अधिकारी क्रांती बोराटे, सहायक गटविकास अधिकारी एम. बी. मोरे यांच्यासह सदस्य व खातेप्रमुखांच्या उपस्थितीत झाली. त्यावेळी एकमताने विविध ठराव मंजूर करण्यात आले.
आपले सरकार सेवा केंद्राच्या नावाखाली कंपनीकडून पैसे जमा केले जातात. त्याबदल्यात कोणतेही काम केले जात नाही. ऑपरेटरला कमी पगार दिले जातात. त्यामुळे कामावर परिणाम होतो. ७९ पैकी फक्त ७५ केंद्रे सुरू आहेत. त्यामुळे पाच केंद्रांसाठी कंपनीवर दंडात्मक कारवाई करूनसुद्धा दंड भरला जात नसल्याने सदस्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अखेरीस ही केंद्रे खासगी कंपनीमार्फत न चालविता बंद करून ग्रामपंचायतींनी स्वतंत्रपणे ऑपरेटर नेमून चालू करावीत, असा एकमुखी ठराव करण्यात आला.
कोरेगाव तालुक्यात ५६ गावांमधील भूजल पातळी कमी झाल्याने तेथे रोजगार हमी योजनेंतर्गत विहिरी घेऊ नयेत, असे पत्र जिल्हा परिषदेने दि. २५ ऑगस्ट रोजी दिले आहे. मात्र, या पत्रामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे नवीन व्यक्तिगत सिंचन विहिरींचा निकष बदलून त्यास मान्यता देण्याचा ठराव देखील एकमताने करण्यात आला.
सभेत स्वच्छ भारत अभियान, कुपोषण निर्मूलन कार्यक्रम, महिला व पुरुष जन्मदर, सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम, पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमासह विविध शासकीय योजनांच्या अनुषंगाने विभागनिहाय आढावा घेण्यात आला.