सातारा : ‘क्षमता नसलेल्या व्यक्तींनी पूर्वीची करणी-भरणी सोडून, सातारा विकास आघाडीमधून बंडखोरी केली आहे. साविआ विरुद्ध बंडखोरी केलेल्यांना, जनता झिडकारणारच आहे. परंतु येथून पुढे अशा बंडखोरांचा विशेष करून शेंद्रे गटातील बंडखोरांचा आमच्याशी संबंध राहणार नाही. ज्या लोकांना आपलं समजत होतो तेच उलट्या काळजाचे निघाले,’ अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी बंडखोरांना फटकारले. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातउदयनराजे यांनी म्हटले आहे की, ‘सुनील काटकर यांच्यासह रवी साळुंखे यांच्यावर आमच्या बरोबरीने तालुक्याची जबाबदारी आहे. ती सांभाळताना, साविआला नियोजनात्मक आणि संघटनात्मक कमतरता भासू नये म्हणून, शेंद्रे गटातून सुनील काटकर यांनी आपले मन मोठे करत, तरुणांना संधी मिळावी आणि ‘साविआ’ला नुकसान पोहोचू नये याकरिता उमेदवारी मागे घेतली.’ (प्रतिनिधी)राजकीय आत्मघात करून घेतला..‘साविआला एकत्र कुटुंब म्हणून आम्ही मानत आलो आहे. एकत्र कुटुंबात थोड्या फार कुरबुऱ्या नेहमीच होत असतात. तथापि, वेळ आली की, कुटुंबातील एकीपुढे दुनियेला झुकवण्याची शक्ती असली पाहिजे, अशी धारणा राहिलेली आहे. तथापि, ज्यांनी बंडखोरी केली त्यांनी खरेतर त्यांचाच राजकीय आत्मघात करून घेतला आहे. आमच्याशी असलेल्या मैत्रिपूर्ण संबंधांनाही त्यांच्याकडून तिलांजली देण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे अशा व्यक्तींशी संबंध राहणार नाही,’ असेही खासदार उदयनराजे यांनी नमूद केले आहे.
आपलेच उलट्या काळजाचे निघाले
By admin | Published: February 14, 2017 9:54 PM