कोरेगाव : वर्षभर महाविद्यालयीन विद्यार्थी ज्या महोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात, असा शिवाजी विद्यापीठाचा युवा महोत्सव युवकांसाठी एक पर्वणीच... त्यामुळे कधी ढोलकीच्या तालावर तर कधी संबळाच्या ठेक्यावर तरुणाईने ताल धरला. अंगावर शहारे आणणारी एकापेक्षा एक सरस नृत्यकला सादर करत प्रेक्षकांची मने जिंकण्याचे काम या तरुणाईने केले.शिवाजी विद्यापीठ आणि डी. पी. भोसले कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारपासून कोरेगावात जिल्हास्तरीय ३८ व्या युवा महोत्सव सुरू झाला. या महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे होते. व्यासपीठावर विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा. डॉ. आर. व्ही. गुरव, अॅड. सुनीता जगताप, चित्रलेखा माने-कदम, प्राचार्य डॉ. एम. एल. होनगेकर, धनसिंग कदम, प्राचार्य डॉ. वाय. बी. गोंडे, प्राचार्य डॉ. विजयसिंह सावंत उपस्थित होते. यावेळी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे, प्राचार्य डॉ. सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. विद्या नावडकर यांनी स्वागत केले. प्रा. संगीता वीरकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. बी. बी. मदने यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सचिन निकम यांनी आभार मानले. कार्यक्रमास शहर परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी विद्यार्थी, विविध महिला मंडळाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.स्पर्धेत ४० महाविद्यालयांमधील ८२० स्पर्धकांचा सहभाग युवा महोत्सवामध्ये लोकसंगीत वाद्यवृंद, लोककला, लोकनृत्य, भारतीय समूहगीत, सुगमगायन, एकांकिका, लघुनाटिका, मूकनाट्य, नकला, वक्तृत्व स्पर्धा, पथनाट्य, वादविवाद आदी स्पर्धा उत्साहात झाल्या. जिल्ह्यातील ४० महाविद्यालयांमधील ८२० स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला. यावेळी उपस्थित तरुणांनी सर्वच संघांच्या नृत्याविष्काराला टाळांचा कडकडाट तसेच शिट्ट्या वाजवून भरभरून दाद दिली.
जोश अन् उत्साहात तरुणाई थिरकली ;कोरेगावमध्ये युवा महोत्सवास उत्साहात प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 10:52 PM