कऱ्हाड : शेतात नांगरट सुरू असताना ट्रॅक्टर विहिरीत कोसळून युवकाचा जागीच मृत्यू झाला. नांदगाव, ता. कऱ्हाड येथील डोकरमाळ नावच्या शिवारात बुधवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. पंकज पांडुरंग पाटील (वय २५) असे त्या युवकाचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, नांदगाव येथील पंकज पाटील या युवकाची डोकरमाळ नावच्या शिवारात शेतजमीन आहे. या जमिनीत सध्या मशागतीचे काम सुरू होते. मशागतीच्या कामासाठी पंकजने त्याच्या मावशीचा ट्रॅक्टर आणला होता. या ट्रॅक्टरद्वारे पंकज स्वत:च्या तसेच परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीची कामे करून देत होता. बुधवारी रात्री तो डोकरमाळ शिवारात चुलत्यांच्या शेतजमिनीत नांगरट करण्यासाठी गेला होता. डोकरमाळ हे शिवार डोंगर पायथ्याला आहे. पंकज ज्या शेतात नांगरटीसाठी गेला होता त्या शेतालगत सुमारे पन्नास फूट खोल विहीर असून, संबंधित विहिरीला पाणी नाही. त्यामुळे ती विहीर मुजविण्याचा निर्णय पाटील कुटुंबीयांनी घेतला होता. मशागतीचे काम संपल्यानंतर विहीर मुजविली जाणार होती. बुधवारी रात्री पंकज एकटाच त्या शिवारात नांगरट करीत होता. नांगरट करीत तो विहिरीजवळ गेला. त्यावेळी ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर विहिरीत कोसळला. त्यामध्ये पंकजचा जागीच मृत्यू झाला. दुर्घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेतली. तसेच याबाबत पोलिसांनाही माहिती देण्यात आली. रात्री उशिरा घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. अपघाताची नोंद कऱ्हाड तालुका पोलिसांत झाली आहे. (प्रतिनिधी)शर्थीचे प्रयत्न...पंकज ट्रॅक्टरसह विहिरीत कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर गावातील शेकडो युवक त्याठिकाणी धावले. अंधार असल्यामुळे बॅटरीच्या उजेडात युवकांनी विहिरीत पाहिले. त्यावेळी पंकज ट्रॅक्टरखाली सापडल्याचे दिसून आले. त्यामुळे युवकांनी परिसरातील दोरखंड जमा करून ते विहिरीच्या काठावरील झाडाला बांधले. दोरखंडाच्या साह्याने पन्नासहून जास्त युवक विहिरीत उतरले. त्यांनी ट्रॅक्टर उचलून बाजूला काढून पंकजचा मृतदेह बाहेर काढला.
नांदगावात ट्रॅक्टर विहिरीत कोसळून युवकाचा मृत्यू
By admin | Published: April 13, 2017 10:53 PM