कऱ्हाड : केंद्र सरकारकडून राज्य सरकार मदत आणू शकले नाही, याचं दुर्दैव वाटतं. आगामी निवडणुकीत पूरग्रस्तांसाठी केलेली सरकारची तुटपुंजी मदत लक्षात ठेवा. मुख्यमंत्र्यांकडून मिळालेल्या मदतीचा जनतेने विचार करावा. जनतेत सरकारबद्दल चीड आहे. त्यामुळेच युवकांनी भविष्यात कोणाला मतदान करायचे, याचा विचार करावा, असे मत खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा गुरुवारी कऱ्हाड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस अभिवादन केल्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांनी कऱ्हाड येथील विद्यानगरमधील वेणूताई चव्हाण महाविद्यालयातील युवक-युवतींशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, शहराध्यक्ष नंदकुमार पटाने उपस्थित होते.अमोल कोल्हे म्हणाले, राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे. यात्रेदरम्यान मी महाविद्यालयीन युवकांची मुद्दाम संवाद साधत आहे. युवक हे देशाचे भविष्य आहे. सातारा जिल्ह्यातील युवकांना राजकारणाची जाण आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर सध्याची राजकीय परिस्थिती, देशात आलेली मंदीची लाट आणि त्यामुळे निर्माण झालेला बेकारीचा प्रश्न मांडण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधणे गरजेचे आहे. युवकांना सगळ्याची जाणीव झाली तर ते नक्कीच बदल घडवून आणू शकतात.यावेळी युवकांनी काही प्रश्न विचारले. कोल्हे म्हणाले, ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यासाठी अहोरात्र लढले. जगले, स्वराज्य उभे केले, त्याप्रमाणे आजच्या युवकांनी उद्याचे भविष्य घडविण्यासाठी विचार करून योग्यप्रकारे मतदान केले पाहिजे.कोल्हे म्हणाले, चंद्रकोर काढल्याने कोणी शिवाजी अथवा संभाजी होत नाही. त्यांचे विचार ही आत्मसात करावे लागतात. आजच्या युवकांनी रस्त्यावर चंद्रकोर काढून फिरण्यापेक्षा आया बहिणी संरक्षणासाठी पुढे यावे. पूरस्थितीवरील प्रश्नावर उत्तर देताना कोल्हे म्हणाले, केंद्र सरकारने राज्य सरकारकडे मदत देण्याचे आश्वासन दिले. मात्र दुर्दैवाने या सरकारला केंद्र सरकारकडून मदत मिळवता आलेली नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विमानातून हवाई पाहणी करतात. तर दुसरीकडे या पूरग्रस्त बांधवांसाठी रस्त्यावरून समाजबांधव गाड्या-गाड्या भरून जीवनावश्यक वस्तू घेऊन जातात. समाजातून पूरग्रस्तांना होत असलेली मदत पाहता शासनाकडून मदत मिळावी, अशी अपेक्षा जनता करत नाही. शिरूर मतदारसंघातून इतक्या क्षमतेने पूरग्रस्तांसाठी मदत देण्यात आलेली आहे, याचा मला अभिमान वाटतो, असे शेवटी कोल्हे म्हणाले.