वाठार, ता. कऱ्हाड येथील कृष्णा फाउण्डेशन शैक्षणिक संकुलात ऑनलाइन चर्चासत्रामध्ये ते बोलत होते. या चर्चासत्रात सायबर क्षेत्रात काम करणाऱ्या विविध मान्यवरांनी सहभाग घेतला होता. विविध विषयांवर यावेळी सखोल चर्चा झाली.
उपनिरीक्षक अमित गोरे म्हणाले, सध्या सायबर नेट, सायबर क्राइम, सायबर सिक्युरिटी असे शब्द सर्रास ऐकायला मिळतात. अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा सोबत आता स्मार्टफोन आणि इंटरनेट ही प्रत्येक तरुणाची गरज बनली आहे. माफक दरात इंटरनेट सुविधा उपलब्ध झाल्यामुळे संपूर्ण विश्व जवळ आले आहे. बँकिंग व्यवहार, बस, रेल्वे, विमान प्रवासाची तिकिटे, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची ऑनलाइन खरेदी वाढली आहे. लग्न जुळविण्यासाठी मॅट्रिमोनिअल संकेतस्थळावरून ऑनलाइन नोंदणी केली जाते. त्यातून लग्नाच्या आमिषाने तसेच ऑनलाइन खरेदी करताना किंवा डेबिट क्रेडिट कार्डचा पासवर्ड चोरून फसवणुकीच्या घटना घडत आहेत. संगणक, इलेक्ट्रॉनिक साधने आणि इंटरनेटच्या मदतीने होणाऱ्या या गुन्ह्यांना सायबर क्राइम असे संबोधले जाते. सोशल मीडियावर जास्तीत जास्त मित्र असणे हे स्टेटस सिम्बॉल मानले जाते. परंतु नवीन मित्र होत असताना किंवा सोशल मीडियावर एकमेकांवर कुरघोडी करीत असताना तरुणांच्या हातून सायबर गुन्हे घडत असल्याचे दिसून येत आहे.
पूजा मुळीक यांनी प्रास्ताविक केले. अमृता पाटील यांनी आभार मानले. या ऑनलाइन व्याख्यानात संस्थेचे सर्व प्राध्यापक, अन्य कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.