सातारा : कासच्या पाण्यासाठी बंदिस्त जलवाहिनीचे काम सुरू असताना क्रेन उलटल्याने त्याखाली सापडून तरुण क्लिनरचा जागीच मृत्यू झाला. कास ते कासाणी रस्त्यावर मंगळवारी दुपारी ही दुर्घटना झाली. मृत्युमुखी पडलेला तरुण पश्चिम बंगालमधील आहे. हरुल मजलेरहमान हुसैन (वय १८, मूळ रा. प. बंगाल, सध्या रा. वांजळवाडी, ता. सातारा) असे या तरुणाचे नाव आहे. हायड्रोक्रेनवर क्लीनर म्हणून तो काम करीत होता. मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास कास-कासाणी रस्त्यावर जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू होते. यावेळी क्रेन अचानक उलटल्याने त्याखाली सापडून हरुल हुसैन गंभीररीत्या जखमी झाला. त्याला तातडीने सातारच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत कास बंदिस्त जलवाहिनीचे काम सुरू आहे. हे काम सुरेंद्र इंजिनिअर्स या मुंबई येथील कंपनीमार्फत करण्यात येत आहे. या कंपनीचा हरूल हुसैन हा कर्मचारी होता. त्याच्या मामाने बंगालहून त्याला कामासाठी येथे आणले होते. हरूलचा मृतदेह पश्चिम बंगालमध्ये त्याच्या गावी नेण्यात येणार आहे. सातारा तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. (प्रतिनिधी)
क्रेन उलटल्याने युवक जागीच ठार
By admin | Published: February 18, 2015 1:02 AM