सातारा : मध्य प्रदेश येथील इंदूर जिल्ह्यातील जामबुजूर्ग येथील एकाचा फलटण तालुक्यातील जिंती येथे सर्पदंशाने मृत्यू झाला. मुरली कटारे असे मृत्यू झालेल्याचे नाव असून ही घटना बुधवार, दि. १३ रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, मुरली भैरूसिंग कटारे (वय ३०, रा. जामबुजूर्ग, ता. महू, जि. इंदूर, राज्य मध्य प्रदेश) हा युवक फलटण तालुक्यातील जिंती गावच्या हद्दीत मोलमजुरी करण्यासाठी आला होता. दौलतनाना यांच्या उसाच्या शेतात असणारा जिंती बंधारा क्रॉस करून आल्यानंतर त्याला सर्पदंश झाला. याचा मुरली कटारे याने स्वत:हून त्याचा मित्र सुरज गिनावा याला मोबाइलवर मेसेज केला. यानंतर सुरज याने मुरली याच्याशी संपर्क केला असता, ''मला साप चावला आहे, तू लगेच ये'', असे त्याने सांगितले. त्यामुळे सुरज आणि सुरेश खोमणे असे दोघेजण जिंती बंधाऱ्याजवळ पोहोचले. येथे दोघांनीही मुरली यास शोधून काढले आणि त्याला साखरवाडी येथील शासकीय रुग्णालयात आणले. मात्र, त्याचा वाटेतच मृत्यू झाला असल्याची माहिती येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेची माहिती सुरज याने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्यानंतर त्याची नोंद झाली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार बी.आर. साबळे हे करत आहेत.