सातारा : अवघ्या आठ दिवसांपूर्वी लग्न करून महाबळेश्वर, पाचगणीला फिरण्यासाठी आलेल्या औंध, पुणे येथील युवकाचा पसरणी घाटात खून करण्यात आला. प्राथमिकदृष्ट्या हल्लेखोरांनी चोरीचा बनाव करून घातपात केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. आनंद ज्ञानदेव कांबळे (वय २६) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. आनंद आणि त्याची पत्नी दिक्षा गेल्या दोन दिवसांपूर्वी महाबळेश्वरमध्ये फिरण्यासाठी आले होते. शनिवारी दुपारी पसरणी घाटातून पुण्याकडे निघाले होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांना अडविले. पत्नीच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याचा बहाणा करतच हल्लेखोरांनी आनंदच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. त्यात आनंद गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पत्नी दिक्षा जखमी असून तिला मानसिक धक्का बसला आहे. त्यामुळे ती बोलण्याच्या मन:स्थितीत नाही. ती शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांना घटनास्थळावरील वृत्तांत समजणार आहे. दरम्यान, आनंद आणि दिक्षाने प्रेमविवाह केला होता. या कारणामुळे तर हा प्रकार घडला नाही ना, यादृष्टीनेही पोलीस शोध घेत आहेत.
पसरणी घाटात नमदाम्पत्यावर हल्ला; पतीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 8:11 PM