लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरेगाव तालुक्यातील रणदुल्लाबाद आणि पळशी या दोन गावच्या मोठ्या तीन पाझरतलावांचे १०० टक्के दुरुस्तीचे काम सीएसआर निधीतून आणि ग्रामस्थांच्या लोकसहभागातून हाती घेतले आहे. त्यापैकी रणदुल्लाबादमधील काम गेल्या एक महिन्यापासून सुरू आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून पळशीमधील तलावाच्या दुरुस्तीचे काम प्रगतिपथावर सुरू आहेत. ही दोन्ही कामे गामगौरव प्रतिष्ठान (पाणी पंचायत) यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहेत.
या कामामुळे दोन्ही गावच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास नक्कीच मदत होणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून जलसंधारणाची कामे करत असताना सीएसआर निधीबरोबरच लोकसहभागालादेखील खूप महत्त्व देत आहोत. कारण होणाऱ्या कामाचा परिणाम खूप चांगल्या प्रकारे दिसत आहे.
गेल्या तीन वर्षांपासून हा पॅटर्न राबवत आहे आणि येणाऱ्या काळात देखील पॅटर्न नियोजित गावांमध्ये राबवून इतर गावे पाणीदार करण्याचा आमचा मानस आहे. पाण्याबरोबर शेतीविषयक व शेतीपूरक व्यवसायांचे प्रशिक्षणाचे कार्यक्रमदेखील राबवीत आहेत. त्यामुळे पारंपरिक पद्धतीच्या शेतीमध्ये योग्यप्रकारे पीक नियोजन करून कमी खर्चात जास्त उत्पादन देणारी पिके घेतली जाऊ लागली आहेत.
सध्याच्या कोरोनाकाळात हे सिध्द देखील झाले आहे तसेच सध्या आपणास शहरांमध्ये नोकऱ्यांची काय अवस्था आहे हे आपल्याला वेगळे काही सांगायची गरज नाही.
नाबार्ड हवामानबदल कार्यक्रम अंतर्गत पाझर तलाव लिकेज काढणे या कामासाठी प्लास्टिक कागद कागदाचा खर्च नाबार्ड बायफ पुणे जय हनुमान पाणलोट संस्था रणदुल्लाबाद यांच्यामार्फत रणदुल्लाबाद गावामध्ये दरे व भोपाळगड या दोन्ही पाझर तलावाचे खोलीकरण गाळ काढणे काम व लिकेज काढणे, ग्रामगौरव प्रतिष्ठान सासवड खळद या संस्थेमार्फत केले गेले व त्यामुळे आमच्या गावात विहिरींच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ होणार आहे. गावातील अर्ध्यापेक्षा जास्त भाग बागायती क्षेत्राखाली येईल व पाण्याची टंचाई दूर होईल, असे रणदुल्लाबादचे सरपंच मंगेश जगताप यांनी सांगितले.
कोट..
मी स्वतः मानव संसाधन विभागात काम करत असल्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण डोळ्याने पाहतो आहे. एका जागेसाठी हजार हजार अर्ज येत असतात.
त्यामुळे आपल्या आपला रोजगार आपल्या गावांमध्ये उपलब्ध करावा लागेल.
- योगेश चव्हाण
जलमित्र दहीगाव
फोटो आहे : कोरेगाव तालुक्यातील रणदुल्लाबाद येथील ग्राम गौरव प्रतिष्ठानच्या वतीने पाझर तलावाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे.