सातारा : साताऱ्यातील गुरुवार पेठेतील वर्दळ सायंकाळीही नेहमीप्रमाणेच सुरू होती... त्याचवेळी एका रिक्षाने तरुणाला धडक दिली.... यामुळे तो खाली पडला... पाहता-पाहता गर्दी जमली; पण तरुणाने काही समजण्याच्या आतच बॅगेतून विषारी औषधाची बाटली काढून पिण्यास सुरुवात केली... काही समजण्याच्या आतच झालेला प्रकार पाहून सारेचजण हबकले; पण गर्दीतील गौरव गवळी हे पुढे आले. त्यांनी संबंधित तरुणाला तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलवून त्याचे प्राण वाचविले.याबाबत माहिती अशी की, येथील गुरुवार पेठतील दंग्या मारुती मंदिर परिसरात अमोल विश्वनाथ शिंगनाथ (वय ३०, रा. उरुळी कांचन) हा युवक रस्त्याने निघाले होते. त्याला एका रिक्षाने धडक दिली. त्यामुळे हा युवक खाली पडला. रस्त्या बाजूला उभे असलेले नागरिक त्याचा मदतीला धावले. थोड्या वेळाने अमोल शिंगनाथ याने त्याचा जवळील बॅगेतील विषारी औषधाची बाटली काढून पिण्यास सुरुवात केली. नागरिकांना काही समजण्यापूर्वीच युवकाने विषारी केमिकल पिऊन संपवले. काही युवक त्याला परावृत्त करण्यासाठी धावलेही; मात्र अमोल शिंगनाथ कोणाचे ऐकण्यास तयार नव्हता. सर्व सुरू असलेला गोंधळ लक्षात आल्यानंतर गौरव गवळी हे धावून आले. गौरव गवळी याने अमोल शिंगनाथ यांच्या जवळील मोबाइलवरून शिंगनाथ यांच्या नातेवाइकांना फोन करून झालेल्या प्रकाराची माहिती दिली. तसेच तत्काळ क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार वेळेत मिळाल्याने अमोल शिंगनाथ या युवकाचा प्राण वाचला. शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.अमोल शिंगनाथ याच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी गौरव गवळी, रोहित लाड, विक्रम यादव, रोहित खोले, रूपेश सपकाळ, रवी कांबळे, ओंकार तपासे आदी युवकांनी भेट घेतली. (प्रतिनिधी)
तरुणांनी वाचविले एकाचे प्राण
By admin | Published: October 23, 2015 10:07 PM