सातारा : कऱ्हाड शहरात मध्यरात्री पवन सोळवंडे (वय ३०) या तरुणावर समोरुन ११ गोळया झाडून निर्घुण खून करण्यात आला. या घटनेमुळे कऱ्हाड शहरात तणावाचे वातावरण असून हा खून टोळी वर्चस्वातून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पवन सोळवंडे हा कऱ्हाड येथील बुधवार पेठेमध्ये राहत होता. रात्री पावणे एकच्या सुमारास पवन हा जेवण करून घराबाहेर आला. याचवेळी त्याच्या घरासमोर दबा धरून बसलेल्या पाच ते सहा हल्लेखोरांनी अगदी जवळून त्याच्यावर गोळीबाराचा वर्षाव केला.
तब्बल अकरा गोळ्या पवनच्या छातीमध्ये, डोक्यामध्ये घुसल्या. त्यामुळे तो जागीच गतप्राण झाला. काही क्षणातच हल्ला झाल्यामुळे त्याच्या घरातल्यानाही याची कल्पना आली नाही. गोळीबाराच्या आवाजाने शेजारी काही लोक बाहेर आले. मात्र तोपर्यंत हल्लेखोर दुचाकीवरून पळून गेले होते.पवन याच्यावरही खंडणी, जबरी चोरी, मारहाण अशा प्रकारचे कऱ्हाड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. दोन दिवसापूर्वीच पवनवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. हा खून टोळी वर्चस्वातून झाला असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.
या खून प्रकरणी अद्यापपर्यंत पोलिसांनी कोणालाही अटक केली नाही. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी कोल्हापूर, सांगली, सातारा येथे पथके रवाना केली आहेत. या खून प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ हे करत आहेत.