तळमावले : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन राबवत असलेल्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी युवक-युवतींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांनी केले.
तळमावले (ता. पाटण) येथील काकासाहेब चव्हाण महाविद्यालयात ‘कोरोनामध्ये ग्रामस्तरावर घ्यावयाची काळजी व उपाययोजना’ या विषयावर आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती प्रताप देसाई, प्राचार्य डॉ. अरुण गाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मीना साळुंखे म्हणाल्या, कोरोनाच्या महामारीवर विजय मिळविण्यासाठी प्रत्येक गावातील सरपंच, युवक, आबालवृद्धांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. त्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागातील तरुण-तरुणींनी समाजाला जागृत करावे. सामाजिक अंतर ठेवणे, मास्कचा वापर करणे, सॅनिटायझर व साबणाने वारंवार हात स्वच्छ ठेवणे या त्रिसुत्रीचे महत्त्व समजावून द्यावे. जास्तीत जास्त लोकांना लसीकरण करून गाव कोरोनामुक्त करण्यासाठी गावातील ग्रामस्तरीय समितीमध्ये तरुणांनी सहभागी होणे गरजेचे आहे. बाधित कुटुंबाना विलगीकरण कक्षात आणणे, त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे, पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग, महसूल विभाग या सर्वांना सहकार्य करावे. संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे, मुलांच्या पालकांचे प्रबोधन करणे आणि संपूर्ण गाव कोरोनामुक्त व्हावे, यासाठी स्वयंसेवकांनी प्रशासन व गाव यामधील दुवा म्हणून भूमिका पार पाडावी.
प्रा. महेश चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सचिन पुजारी यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. संभाजी नाईक यांनी आभार मानले.