वरकुटे-मलवडी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बनगरवाडी येथील रुग्णसंख्या पन्नाशीच्या घरात जाऊन पोहोचल्यामुळे संसर्गाची साखळी तोडण्यासाठी येथील राॅयल क्लबच्या तरुणांनी स्वयंस्फूर्तीने संपूर्ण गावाची जबाबदारी सांभाळली आहे. यामध्ये गावातून जनजागृती केली जात असून ज्येष्ठांना जीवनाश्यक वस्तू घरपोच केल्या जात आहे.
बनगरवाडीत सर्वजण एकमेकांचे पै-पाहुणे आहेत. पूर्वीपासूनच हसतखेळत राहणे आणि एकमेकांबरोबर सलगीची वागणूक असल्याने दररोज एकमेकांच्या घरी जेवण गप्पागोष्टी करण्यासाठी कामधंदा करण्यासाठी अधिकाराने जाणं-येणं हे पूर्वीपासूनच चालत आले आहे. त्यामुळे आठ दिवसात बनगरवाडीत केव्हा कोरोनाचा हॉटस्पॉट झाला. हे लवकर समजून आले नाही. मात्र सध्या बनगरवाडीत कोरोना संसर्गाच्या संख्येनं पन्नाशी पार केली आहे. त्यामुळे येथील राॅयल क्लबच्या तरुणांनी गाव कोरोनामुक्त करण्यासाठी जनजागृती करीत सोशल डिस्टन्स ठेवून लाऊडस्पीकर लावून भरदिवसा गस्त घालण्याची मोहीम सुरु केली आहे. वयोवृद्ध नागरिकांना घरपोच किराणा माल तसेच जीवनावश्यक वस्तू पोहोचवल्या जात आहेत. कसलीही अडचण
आल्यास हे तरुण मदत करण्यास तत्पर तयार राहत असल्यामुळे परिसरातील नागरिकांतून तरुणांचं कौतुक होत आहे.
कोट :
बनगरवाडी कोरोनाचा हॉटस्पॉट झाल्यामुळे, नागरिकांनी ' जनता कर्फ्यू ' चे नियोजन केले आहे. मात्र काही ग्रामपंचायत सदस्य बाहेर पडत नसल्याने, ग्रामस्थांमध्ये कोरोनाच्या संसर्गाबद्दल प्रबोधनाची गरज आहे. त्यामुळे राॅयल क्लबचे तरुण दिवसभर गस्त घालत आहेत. स्वयंस्फूर्तीने दिवसभर लाऊडस्पीकरवर गल्ली बोळासह, रस्त्यावर फिरुन प्रबोधन करीत आहेत.
- जोतीराम तायाप्पा बनगर
माजी सैनिक बनगरवाडी
फोटो
बनगरवाडीत भरदिवसा राॅयल क्लबचे तरुण जनजागृती करत आहे. (छाया : सिद्धार्थ सरतापे)