धीरज कदम -कोयनानगर -निसर्गाची मुक्त उधळण केलेल्या कोयनानगर परिसरात पावसामुळे निसर्ग सौंदर्यात आणखी भर पडली आहे. हे सौंदर्य पाहण्यासाठी निसर्गप्रेमी आपल्या कुटुंबीयांसमवेत या परिसराला भेट देत आहेत. वाहतुकीची चांगली सोय असल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र, हुल्लडबाजी करणारांची संख्याही लक्षणीय असते. मद्यप्राशन करून हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांना आवर घालावा, अशी मागणी ग्रामस्थ व पर्यटकांमधून होत आहे.ओझर्डे धबधबा पाहण्यासाठी पर्यटक धबधब्यात उतरतात. पण त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी कोणीही कर्मचारी वरती जात नाही. त्यामुळे येथे एखादी दुर्घटना घडली तर जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे. काही वेळा येथील वन कर्मचाऱ्यांकडून देखील नियमांचे उल्लंघन केले जाते. याचा प्रत्यय काही दिवसांपूर्वी सगळ्यांना आला. वनविभागाने आजवर आमच्यावर अनेक बंधने लादली. आता त्यांचे कर्मचारीही आमच्यावर अन्याय करणार का? असे स्थानिकांमधून बोलले जात आहे. कोयना परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने येथे ओझर्डेसारखे अनेक लहान-मोठे धबधबे कोसळतात. येथे येणारे बहुतांशी पर्यटक हे तरुण वर्गातील असतात. बेभान गाड्या चालविणे, रस्त्यावर, शेतात कोठेही ओल्या पार्ट्या करणे, मद्यप्राशन करून दंगा करणे असे प्रकार वाढू लागले आहेत. त्यामुळे या परिसरात जनावरे घेऊन जाणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हुल्लडबाजांवर पोलिसांनी नियंत्रण ठेवावे, अशी मागणी होत आहे. बाहेर गावाहून येणाऱ्या काही पर्यटकांकडून येथे मद्यप्राशन करून दंगामस्ती केली जाते. तसेच येथे वळणाचा रस्ता असूनही वेगाने गाड्या चालवल्या जातात. त्यामुळे येथे अनेकदा लहान-मोठे अपघात होतात.- अर्जुन देसाई, मानाईनगर
ओझर्डे धबधबा परिसरात तरुणाईची हुल्लडबाजी
By admin | Published: July 12, 2015 9:52 PM