सातारा : मराठा आरक्षणासाठी राज्यभर साखळी उपोषण सुरू असून, सोलापूर जिल्ह्यातील दोन तरुणांनी बुधवारी थेट सातारा गाठला. पंढरपूर ते सातारा तब्बल १८५ किलोमीटर अंतर पायी चालत येऊन या तरुणांनी स्वतःच्या रक्ताने लिहिलेलं पत्र खासदार उदयनराजे भोसले यांना दिले. तसेच मराठा आरक्षणाची मागणीही केली.शहाजी दांडगे, (रा. मुंडेवाडी, ता. पंढरपूर) व ज्ञानेश्वर गुंड (रा. आष्टी, ता. मोहोळ) असे या तरुणांचे नाव आहे. मराठा आंदोलनाचा एक भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यातील या तरुणांनी पंढरपूर ते सातारा अशी १८५ किलोमीटर पदयात्रा काढली. पंढरपूर, महुत, दिघंची, मायणी, औंध असा पाच दिवस पायी चालत प्रवास करून दोघे तरुण बुधवारी साताऱ्यात दाखल झाले. या प्रवासात त्यांना नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले. जेवणासह त्यांच्या राहण्याचीदेखील व्यवस्था केली. साताऱ्यात आल्यानंतर त्यांनी थेट खासदार उदयनराजे भोसले यांची जलमंदिर या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी खा. उदयनराजे यांना स्वतःच्या रक्ताने लिहिलेलं पत्र देखील दिले. मराठा आरक्षणासाठी तरुणांनी केलेला हा प्रवास आणि त्या पत्रातील मजकूर वाचून उदयनराजे भावुक झाले.
..तर पुढची पिढी माफ करणार नाही : उदयनराजे
- उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणावरून आपले सडेतोड मत व्यक्त केले. तरुणांनी दिलेल्या पत्राचा आधार घेत ते म्हणाले, निवडणुका आणि आरक्षण यांचा काहीही संबंध नाही.
- निवडणुका घ्या अगर नका घेऊ; परंतु आरक्षणाचा विषय हा मार्गी लागलाच पाहिजे. यावर ठोस निर्णय न घेतल्यास पुढची पिढी तुम्हाला आणि आम्हाला कदापी माफ करणार नाही.
- आमदार असो किंवा खासदार तुम्ही ज्या पदावर आहात ते केवळ समाजामुळे आहात. लोक तुम्हाला निवडून देतात याचा अर्थ त्यांच्या विश्वासाला पात्र राहणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे.
- जोपर्यंत जनगणना होत नाही, प्रत्येकाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका.
- मराठा आरक्षणासाठी जर आत्महत्या वाढू लागल्या तर याला सर्वस्वी शासन जबाबदार असेल.
- आरक्षणाबाबत प्रत्येक वेळी सोयीप्रमाणे एक महिना, दोन महिना वेळ वाढवून घ्यायची, हे नेमकं काय चाललंय? हेच कळत नाही.