मलकापूर : रंगपंचमीदिवशी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून जखिणवाडीच्या ३० ते ४० युवकांनी नांदलापुरात जाऊन शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास चांगलाच धुडगूस घातला. संतप्त युवकांनी हातात गज, काठ्या व दांडकी घेऊन दिसेल त्याला मारहाण केली. तसेच वाहनांसह घराचीही तोडफोड केली. या मारहाणीत एका युवकासह वृद्ध जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. युवकांनी आबालवृद्धांसह महिलांनाही यावेळी मारहाण केली. त्यामुळे नांदलापूर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जखिणवाडी व नांदलापूर गावांत दिवसभर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या दोन्ही गावांना पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. युवकांच्या मारहाणीत अमोल हिंदुराव लावंड (वय २२) व गणपतराव रामचंद्र डिसले (८०, दोघेही रा. नांदलापूर) हे जखमी झाले. याप्रकरणी सातजणांना कऱ्हाड शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रंगपंचमीदिवशी रंग लावण्याच्या कारणावरून जखिणवाडीतील युवकांची नांदलापुरातील युवकांशी बाचाबाची झाली होती. त्यावेळी नांदलापुरातील युवकाने जखिणवाडीतील युवकाच्या थोबाडीत मारली. रंगपंचमी दिवशी झालेल्या या भांडणाचा राग मनात धरून शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास जखिणवाडीतील ३० ते ४० युवक हातात काठ्या, दांडकी व काचेच्या बाटल्या घेऊन नांदलापुरात आले. सकाळची वेळ असल्यामुळे ग्रामस्थांसह काही युवक मारुती मंदिराच्या समोरील पारावर बसले होते. काही कळण्यापूर्वीच त्या ३० ते ४० युवकांच्या जमावाने दिसेल त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे युवकांसह आबालवृद्ध व महिला रस्त्याने सैरावैरा पळू लागले. एवढ्यावरच न थांबता जखिणवाडीच्या युवकांनी रस्त्याकडेला उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करत चांगलाच ‘रोड शो’ केला. काही घरात घुसून त्यांनी महिलांना शिवीगाळ व धक्काबुक्की करत घरातील संसारोपयोगी साहित्यही विस्कटून टाकले. धक्काबुक्कीत धनश्री डिसले या महिलेचे मंगळसूत्र गहाळ झाले आहे. याबाबतची नोंद कऱ्हाड शहर पोलिसांत झाली आहे.
नांदलापुरात युवकांचा धुडगूस
By admin | Published: March 15, 2015 12:19 AM