लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : मोबाईलद्वारे अथवा ऑनलाईन नोंदणीनंतर अवघ्या काही मिनिटांत गरमागरम जेवण, नाष्टा, तर इलेक्ट्रॉनिक, गृहोपयोगी, आदी वस्तू एक-दोन दिवसांत घरबसल्या अथवा नोंदणी केलेल्या ठिकाणावर उपलब्ध होते. या ऑनलाईन फूड आणि लॉजिस्टिक डिलिव्हरीने साताऱ्यातील ४०० हून अधिक तरुणांच्या हाताला काम दिले आहे.
सध्या बहुतांश क्षेत्रात ऑनलाईन कामावरील भर वाढला आहे. हॉटेल इंडस्ट्रिजमधील ऑनलाईन फूड डिलिव्हरी देण्याचे प्रमाण वाढत आहे. मुंबई, पुणेनंतर आता त्या पद्धतीची सुविधा देणाऱ्या कंपन्यांचे साताऱ्यातही काम सुरू झाले आहे. सध्या जेवण, नाष्टा, आईस्क्रीम, पिझ्झा, आदी खाद्यपदार्थ आणि विविध वस्तू ग्राहकांना घरपोच करणाऱ्या चार कंपन्यांच्या माध्यमातून सातारा शहर आणि ग्रामीण भागातील सुमारे ४०० तरुण कार्यरत आहेत. त्यामध्ये ऑनलाईन फूड डिलिव्हरीचे काम करणाऱ्यांचे प्रमाण ९० टक्के आहे. फूड डिलिव्हरी करणाऱ्या संबंधित कंपन्यांकडे नोंदणी शुल्क भरल्यानंतर त्यांच्याकडून काम करणाऱ्या तरुणाला दोन टी-शर्ट, बॅग दिली जाते. हे काम करण्यासाठी मोबाईल, दुचाकी आणि फूड लायसन तरुणाकडे असणे आवश्यक आहे. त्यांना कमिशन तत्त्वावर मोबदला मिळतो. पेट्रोल भत्ता मिळत नाही.
साधारणत: दरमहा १२ ते १८ हजार रुपयांची कमाई होते. वस्तू पोहोचविण्याचे काम करणाऱ्याला डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह, तर खाद्यपदार्थ पोहोचविणाऱ्या कर्मचाऱ्याचा डिलिव्हरी पार्टनर असा उल्लेख केला जातो. आपल्या सोईनुसार काम करण्याचा पर्याय उपलब्ध असल्याने रोजगाराच्या या नव्या क्षेत्राला तरुणाई पसंती देत आहे. त्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक असून, ते वाढत आहे.
........................................................................................
काम आणि मोबदला असा
ग्राहकाने त्याला हवे असणारे जेवण, नाष्टा अथवा वस्तूंचे ऑनलाईन पेमेंट करून अथवा कॅश ऑन डिलिव्हरीची नोंदणी संबंधित कंपन्यांचे संकेतस्थळ, दूरध्वनी अथवा मोबाईल अॅपद्वारे केल्यानंतर त्याबाबतचा संदेश संबंधित हॉटेल, कंपनी आणि तरुणाच्या मोबाईलवर जातो. ज्या हॉटेलमधून मागणी केली आहे, त्या परिसरातील डिलिव्हरी पार्टनरच्या मोबाईलवर संदेश जातो; त्यामुळे शहरातील विविध हॉटेल परिसरात दुपारी एक आणि सायंकाळी सहानंतर डिलिव्हरी पार्टनरची गर्दी दिसते. या संदेशामध्ये संबंधित मागणी कुठे पोहोच करावयाची त्याचा उल्लेख असतो; त्यासाठी १० ते १५ मिनिटांची वेळ असते. दुपारी एक ते तीन आणि सायंकाळी सहा ते रात्री साडेदहा या वेळेत ग्राहकांची मागणी असते. खाद्यपदार्थांच्या प्रत्येक मागणीवर, तर वस्तूवर त्या तरुणाला १३ ते २५ रुपयांपर्यंत कमिशन मिळते. मागणीचा ठरावीक आकडा पूर्ण झाल्यानंतर कंपनीकडून प्रोत्साहन म्हणून अतिरिक्त रक्कम दिली जाते.
.............................................................................................
प्रतिक्रिया
संयम आणि काम करण्याची तयारी असेल, तर या क्षेत्रात चांगले पैसे मिळतात. पार्ट टाईम काम करून शिक्षण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे या क्षेत्रामध्ये येण्याचे प्रमाण अधिक आहे.
- सुरज कदम, डिलिव्हरी बॉय, सातारा
...................
चिकाटीने काम केल्यास या कामातून बऱ्यापैकी चांगला मोबदला मिळतो. रोजगाराचे नवे क्षेत्र कोल्हापूरमधील तरुणाईला उपलब्ध झाले आहे.
- प्रणव तोडकर, डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह, सातारा.