सातारा : चौदा वर्षांच्या मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी वाई येथील एकोणीस वर्षांच्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. कोसमकर यांनी बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये एक वर्ष सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. अभिजित शिवाजी मोरे (रा. गंगापुरी, वाई) असे आरोपीचे नाव आहे. २२ सप्टेंबर ते ३ नोव्हेंबर २०१३ या काळात तो एका चौदा वर्षांच्या मुलीची सातत्याने छेडछाड करीत होता. मित्रांसह तो तिचा पाठलाग करीत असे. ‘तू मला आवडतेस. तुझ्याशी लग्न करायचे आहे. लग्न केले नाहीस तर तुझ्या भावाचा खून करेन,’ असे तो तिला म्हणत असे. ३ सप्टेंबर २०१३ रोजी वाईच्या घाटावर संबंधित मुलगी कपडे धुण्यासाठी गेली होती. तिचा भाऊही सोबत होता. त्यावेळी आरोपी अभिजित मोरे तेथे आला आणि तेथून मित्रांना ‘गाडी घेऊन या,’ असा फोन केला. मुलगी आणि तिच्या भावाने घाबरून पोलिसांकडे तक्रार केली आणि पोलिसांनी आरोपीला अटक केली.सहायक फौजदार जी. डी. ठाकरे यांनी याप्रकरणी तपास करून आरोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात पीडित मुलगी, तिची आई, मावशी यांच्यासह एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षातर्फे अॅड. मिलिंद ओक यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)विनयभंगप्रकरणी एकास सक्तमजुरीकऱ्हाड : आटके, ता. कऱ्हाड येथील शांताराम जगन्नाथ पवार याला महिलेच्या विनयभंगप्रकरणी न्यायालयाने सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. न्या. एस. डी. कुरणे यांनी ही शिक्षा सुनावली असून, पीडित महिलेस दोन हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे. संबंधित पीडित महिला १० आॅगस्ट २०११ रोजी तिच्या घरासमोर भांडी घासत असताना शांताराम पवार याने तिचा विनयभंग केला होता. संबंधित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार त्यावेळी शांताराम पवार याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. सहायक फौजदार यू. एस. वाघ यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर केले. प्रथमवर्ग न्या. एस. डी. कुरणे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षाच्या वतीने पाच साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाचा युक्तिवाद व सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने शांताराम पवार याला विनयभंगप्रकरणी सहा महिने सक्तमजुरी, तीन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधी कैद तसेच अश्लील वर्तन केल्याप्रकरणी तीन महिने सक्तमजुरी, दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास पंधरा दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षाच्या वतीने अॅड. स्वाती हणमंतराव पन्हाळे व एन. बी. गुंडे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
छेडछाडप्रकरणी तरुणास सक्तमजुरी
By admin | Published: March 20, 2015 11:46 PM