मायणी : ‘राष्ट्रपती पदकप्राप्त व खटाव तालुक्यातील उपक्रमशील शाळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या मायणी जिल्हा परिषद शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे,’ असे प्रतिपादन सरपंच सचिन गुदगे यांनी केले.
ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगातून तीन लाख रुपये किमतीच्या संरक्षक भिंतीचा भूमिपूजन समारंभ झाला, यावेळी ते बोलत होते. माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, माजी उपशिक्षणाधिकारी राजकुमार चव्हाण, पोलीस पाटील प्रशांत कोळी, मुख्याध्यापिका उमा वडगावकर, वनीता कुलकर्णी, उपसरपंच आनंदा शेवाळे, माजी उपसरपंच सूरज पाटील, ग्रामपंचायत सदस्य बंडा माळी, जगन्नाथ भिसे आदी उपस्थित होते.
सरपंच सचिन गुदगे म्हणाले, ‘ग्रामपंचायतीच्या सत्तेत आल्यापासून शाळेत ई लर्निंग, साऊंड सिस्टिम, स्टेज दुरुस्ती आदी कामे केली आहेत. यापुढे विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळण्यासाठी यंत्र तसेच स्वच्छतागृहाचे काम पूर्ण करणार आहे.
माजी आमदार डॉ. येळगावकर यांनी, लहानपणी कमवा व शिका या योजनेत केलेली कामे सांगितली. तसेच शाळेचा भौतिक दर्जा सुधारण्यासाठी ५० हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले. यामधून शाळेचे क्रीडांगण, झाडे लावणे, विद्युत मोटर बसविणे आदी कामे मार्गी लावली जाणार आहेत.
यावेळी अलका पिसाळ, वैशाली कालेकर, विजया सनगर, वैशाली कांबळे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे रामचंद्र जगताप यांनी सूत्रसंचालन केले, तर वैशाली कांबळे यांनी आभार मानले.
\\\\\\\\\\\\\\\\\\\\\