पिंपोडे बुद्रुक : ‘कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणायचा असेल तर लसीकरण गतीने होणे गरजेचे आहे. सातारा जिल्हा परिषदेने लसीकरणासाठी पुढाकार घेतला असून, शहरी भागासह ग्रामीण भागातील दुर्गम गावांमध्येही लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे,’ असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मंगेश धुमाळ यांनी केले.
चवणेश्वर (ता. कोरेगाव) येथे कोरोना लसीकरण मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरपंच दयानंद शेरे, धनंजयबापू धुमाळ, संतोष पवार, युवराज शेरे, हरिदास शेरे, रमेश पवार, किरण पवार, गावकामगार तलाठी राहुल नाळे, संदीप धुमाळ, माजी उपसरपंच बाळासाहेब सूर्यवंशी, विठ्ठल शेरे, लक्ष्मण रांजणे, प्राथमिक शाळेतील शिक्षक गिरीश धायगुडे, आरोग्य कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
मंगेश धुमाळ म्हणाले, ‘गेल्या सव्वा वर्षाहून अधिक काळ कोरोनाच्या संकटाचा आपण सामना करत आहोत. कोरोना लसीकरणाबाबत कोणीही गैरसमज न ठेवता लसीकरणाचा लाभ घ्यावा. लसीबाबत काही अफवा पसरवल्या जात असून, अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. लसीकरणाची मोहीम गतीने राबविल्यास कोरोना नियंत्रणात येणार आहे. चवणेश्वर येथील ग्रामस्थांच्या मागणीनुसार, गावात लसीकरणाची सोय करण्यात आली आहे.’
सरपंच दयानंद शेरे म्हणाले, ‘कोरोना संकटाने गावगाड्याच्या कारभारावर विपरीत परिणाम झाला आहे. छोट्या गावांचा महसूल कमी असल्याने अनेक अडचणी येत आहेत. ग्रामपंचायतींच्या पथदिवे आणि पाणी पुरवठा योजनेचे बिल सरकारने भरावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न व्हावेत.’ संतोष पवार यांनी आभार मानले.
फोटो -
०५ चवणेश्वर
चवणेश्वर येथे लसीकरण मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी मंगेश धुमाळ, धनंजय धुमाळ, दयानंद शेरे, संतोष पवार, रमेश पवार, राहुल नाळे, आदी उपस्थित होते.