सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांची सभा शुक्रवार, १२ मार्चला कऱ्हाड येथे होणार आहे. तर या सभेपूर्वी प्रीतिसंगमावर महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांना जयंती दिनानिमित्ताने अभिवादन करण्यात येणार आहे. या वेळी पदाधिकारी, अधिकारी आणि सदस्य उपस्थित राहणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी १९ फेब्रुवारीला किल्ले प्रतापगडावर शिवजयंती साजरी करण्यात येते. त्यानंतर महाबळेश्वरात विविध विषय समित्यांची सभा होते, तर १२ मार्चला कऱ्हाड येथे विषय समित्यांची सभा होते. तसेच यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यात येते. या वर्षीही कऱ्हाड येथे कार्यक्रम होणार आहेत.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स आणि गर्दी न करता हे कार्यक्रम होणार आहेत. शुक्रवारी सकाळी आठला साताऱ्यातील पोवई नाक्यावर छत्रपती शिवाजी महाराज, दिवंगत यशवंतराव चव्हाण आणि किसन वीर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी आणि सदस्य कऱ्हाडकडे रवाना होणार आहेत.
कऱ्हाड येथे सकाळी नऊला प्रीतिसंगमावर दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर तेथीलच बचत भवनमधील यशवंतराव चव्हाण सभागृहात विविध विषय समित्यांची सभा होणार आहे.
......................................................