लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्हा परिषदेच्यावतीने आज, शुक्रवारी किल्ले प्रतापगड येथे शिवजयंतीचा कार्यक्रम होत आहे. यासाठी अधिकारी आणि पदाधिकारी तसेच सदस्य गुरुवारी महाबळेश्वर मुक्कामी होते. शुक्रवारी सकाळपासून प्रतापगडावर विविध कार्यक्रम होणार आहेत, तसेच महाबळेश्वरमध्ये जिल्हा परिषदेच्या विविध समित्यांची सभा होणार आहे.
दरवर्षी १९ फेब्रुवारी या शिवजयंती दिनी जिल्हा परिषदेच्यावतीने प्रतापगडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी शुक्रवारी सकाळी सव्वासात वाजता श्री भवानी मातेस अभिषेक घालण्यात येणार आहे. अध्यक्ष उदय कबुले व मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी सव्वाआठ वाजता श्री भवानी मातेची महापूजा करण्यात येईल. नऊ वाजता श्री भवानी माता मंदिरासमोर ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सव्वानऊ वाजता साध्या पद्धतीने पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे, तर दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ पूजन व ध्वजारोहण कार्यक्रम होईल. त्यानंतर बारा वाजता श्री भवानी माता मंदिरात महाआरती होऊन कार्यक्रम संपणार आहेत.
दरम्यान, महाबळेश्वर येथे पंचायत समितीत जिल्हा परिषदेच्या विविध समित्यांची सभा होणार आहे. या सभेला सभापती, समिती सदस्य आणि अधिकारी उपस्थित राहणार आहेत, असे सांगण्यात आले.
.........................................................................