शिरवळ : शिरवळ येथे भरधाव दुचाकीची अचानकपणे रस्ता दुभाजकामधून आलेल्या ट्रॅक्टरला धडक बसली. यामध्ये दोन तरुण गंभीर जखमी झाले होते. हा अपघात लक्षात येताच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांनी त्यांना प्रसंगावधान दाखवत शिरवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. हा अपघात शिरवळ येथील लॉकिम फाट्याजवळ घडला.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कोरेगाव तालुक्यातील निकमवस्ती येथे मैत्रिणीच्या बहिणीचे लग्न असल्याने मंगेश विठ्ठल पवार (वय २३, रा. शेनगाव, जि. चंद्रपूर, सध्या रा. पुणे) व अजिंक्य विकास दुरापे (रा. जुन्नर जि. पुणे, सध्या रा. पुणे) हा दोघे दुचाकीवरून आले होते. लग्न उरकून दोघे दुचाकीवरून पुण्याकडे येत असताना शिरवळ हद्दीमध्ये रस्ता दुभाजकांमधून डबल ट्रॉली असणारा ट्रॅक्टर (एमएच ४५ एफ ६४५३) अचानकपणे आडवा आला व दुचाकीची धडक या ट्रॅक्टरला जोरात बसली. त्यामुळे मंगेश पवार व अजिंक्य दुरापे गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर बघ्यांनी घटनास्थळावर गर्दी केली होती. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले हे पांडे (ता. भोर) येथील लग्न उरकून शिरवळकडे येत असताना, गर्दी पाहून ते थांबले. त्यावेळी तरुण गंभीर जखमी झाल्याचे निदर्शनास आले. कबुले यांनी महामार्गावरून जाणारे वाहन थांबवित जखमी तरुणांना शिरवळ येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. याची शिरवळ पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. ट्रॅक्टर चालकाविरुद्ध मंगेश पवार याने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.