सातारा : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून, जिल्हा परिषदेमध्येही कर्मचारी बाधित होत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने आता १५ टक्के कर्मचाऱ्यांवर काम सुरू केले आहे. रोटेशन पद्धतीने कर्मचारी व अधिकारी कामावर येणार आहेत, तर अत्यावश्यक सेवा देणारे विभाग पूर्णपणे चालू राहणार आहेत.
जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमध्ये मागील दोन महिन्यांपासून बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदेमधील अनेक कर्मचारीही संसर्गित झाले आहेत. त्यातच जिल्ह्यातून दररोज अनेक नागरिक जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीमध्ये कामकाजासाठी येतात, त्यामुळे संसर्गाची भीती असते. हे टाळण्यासाठी शासनाने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने सूचना केली आहे. त्यानुसार सातारा जिल्हा परिषदेमध्येही १५ टक्के कर्मचाऱ्यांवर काम सुरू झाले आहे. तसेच रोटेशन पद्धतीने कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना कामावर हजर राहावे लागणार आहे.
सातारा जिल्हा परिषदेंतर्गत अत्यावश्यक सेवा देणारे विभाग हे पूर्णपणे चालू राहणार आहेत. यामध्ये आरोग्य विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा व मान्सूनपूर्व कामे करणारे विभाग सुरू राहणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेमध्ये मागील दोन दिवसांत अनेक कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.
फोटो दिनांक २६सातारा झेडपी... मेलवर
फोटो ओळ : सातारा जिल्हा परिषदेमध्ये कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर १५ टक्के कर्मचाऱ्यांवर कामकाज सुरू आहे. त्यामुळे अनेक विभागात काही टेबल मोकळे दिसत आहेत. (छाया : नितीन काळेल)