सातारा : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी राजीनामा दिला असलातरी इतर पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळपर्यंत काहीही हालचाल केलेली नव्हती. असे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठांनी संबंधितांशी राजीनामा देण्याविषयी चर्चा केली आहे. सर्व पदाधिकारी सोमवारी राजीनामे देतील, असे सांगण्यात आले. संक्रांत, शनिवार अशा घटनांमुळे (ना) राजीनामास्त्र पुढे गेले आहे. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांसह इतर पदाधिकारी बदलाच्या हालचाली गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहेत. मात्र, या गोष्टीला जानेवारी महिना उजाडला. आता नवीन पदाधिकाऱ्यांना अवघा कसाबसा एक वर्षाचाच कालावधी मिळणार आहे. त्यातच सध्याच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास विलंब लावला आहे. त्यामुळे नवीन अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची निवड कधी होणार, हे पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी गुरुवारी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांची भेट घेऊन पदाचा राजीनामा दिला. मात्र, उपाध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला नव्हता. शुक्रवारी सायंकाळपर्यंतही कोणी राजीनामा देण्याच्या भूमिकेत नव्हते. असे असले तरी सोमवारी उपाध्यक्षांसह सर्वच पदाधिकारी राजीनामा देणार आहेत, असे सांगण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठांनी शुक्रवारी इतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. सर्वांशी राजीनामा देण्याविषयी चर्चा झाली आहे. सध्या संक्रांत तसेच पुढे शनिवार, रविवार असल्याने पदाधिकाऱ्यांनी सोमवार हा दिवस राजीनाम्यासाठी निवडला असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
सध्या संक्रांतीचा सण आहे. त्यानंतर शनिवार, रविवार हे सुटीचे दिवस आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेचे इतर पदाधिकारी सोमवारी पदाचा राजीनामा पक्ष कार्यकारिणीकडे देतील. माझी सर्वांशी चर्चा झाली आहे. त्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही. - सुनील माने, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस