कऱ्हाड : ‘ज्या योजना आम्ही राबविल्या, त्याचा लाभ लोकांना होत आहे. त्यामुळे त्या आम्हीच मंजूर केल्या हे त्यांना माहीत असणारच; पण तरीही लोकसभेचा निकाल पाहता सध्याचे युग मार्केटिंगचे असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत आम्हीही मार्केटिंग करू,’ अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. मुख्यमंत्री आज, मंगळवारी कऱ्हाड दौऱ्यावर असताना येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार आनंदराव पाटील, धैर्यशील कदम, राहुल चव्हाण, शिवराज मोरे, आदी उपस्थित होते. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘केंद्र सरकारने रेल्वे अर्थसंकल्प मांडला; पण त्यात महाराष्ट्राची पूर्ण निराशा झाली आहे. आधी साडेचौदा टक्के दरवाढ करता, आम्ही आंदोलन केल्यानंतर ती मागे घेता आणि पुन्हा रेल्वे बजेटमध्ये महाराष्ट्रातील जनतेच्या तोंडाला पाने पुसता, याचा मी निषेध करीत आहे. दरवाढ केली नसती तर दोन महिन्यांत रेल्वे बंद पडली असती, अशी वल्गना करणाऱ्या केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आता त्याचे स्पष्टीकरण जनतेला द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. रेल्वे मंत्रालय बुलेट ट्रेनची भाषा करीत आहे; परंतु ज्या मुंबईमध्ये एक कोटी लोक रेल्वेने प्रवास करतात, त्यांचा विचार करताना मात्र दिसत नाही. त्यांची बुलेट ट्रेनबाबतची काय धोरणे आहेत ते त्यांनी स्पष्ट करायला पाहिजेत. गुजरात आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांची एकाच वेळी निर्मिती झाली. महाराष्ट्र आजही गुजरातपेक्षा आघाडीवर आहे. लोकसभा निवडणुकीत विकासाची भरपूर कामे करूनही लोकांपर्यंत पोहोचू शकला नाहीत, त्यामुळेच पक्षाचा पराभव झाला काय, असा प्रश्न विचारताच ‘ज्या योजना आम्ही राबविल्या त्याचा लाभ लोकांना होत आहे. त्यामुळे त्या आम्हीच मंजूर केल्या, हे त्यांना माहीत असणारच; पण तरीही लोकसभेचा निकाल पाहता सध्याचे युग मार्केटिंगचे असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत आम्हीही मार्केटिंग करू’, असेही मुख्यमंत्री म्हणाले. ‘जागा वाटप’ माध्यमांशी बोलण्याचा विषय नाही!राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेसाठी फिप्टी-फिप्टी जागांची मागणी करीत आहे, असे विचारले असता ‘तो माध्यमांशी बोलण्याचा विषय नाही. याची चर्चा पक्षांतर्गत बैठकीत होणे अपेक्षित आहे. आणि दोन्ही पक्षांचे नेते त्यावर निर्णय घेतील. आम्ही पाच निवडणुका एकत्रित लढलोय. तुम्ही चिंता करू नका’, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
विधानसभेला जोरात मार्केटिंग करणार
By admin | Published: July 08, 2014 11:50 PM