सातारा : साताऱ्यातील काँग्रेसचा मेळावा भविष्यातील रणनिती आणि भूमिका काय असणार, हेच दाखवून गेला. कारण प्रत्येकाच्या भाषणात पक्षाला जिल्ह्यात गतवैभव मिळवून देण्यासाठीचा आवेश होता. आमदार जयकुमार गोरे यांनी तर जिल्ह्यात झेडपी आणि जिल्हा बँक ही दोनच सत्तास्थाने असून, तेथे धडक मारण्याचे व विधानसभेला अर्ध्या जागा घेण्याची स्पष्ट भूमिका घेतली. नूतन जिल्हाध्यक्षांनी तर कार्यकर्त्यांच्या संरक्षणासाठी संघार्षाचा विचारही बोलून दाखविला.
येथील जिल्हा काँग्रेस कमिटीच्या आवारात नूतन जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा पदग्रहण समारंभ आणि मेळाव्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर, विधान परिषदेचे आमदार मोहनराव कदम, आमदार आनंदराव पाटील, आमदार जयकुमार गोरे, रजनी पवार, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा धनश्री महाडिक, जिल्हा परिषद सदस्या जिजामाला नाईक-निंबाळकर, धैर्यशील सुपले, शहराध्यक्ष रवींद्र झुटिंग, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, हिंदुराव पाटील, भीमराव पाटील, धैर्यशील कदम उपस्थित होते.
या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जिल्ह्यात आघाडीमध्ये न्याय मिळाला नसल्याची सल बोलून दाखवितानाच आता काँग्रेस पंरपरेची आठवण करून देणारा कार्यक्रम साताºयात घेण्याचा इरादा जाहीर केला. तसेच पक्ष वाढीसाठी वेळ देणार असल्याचे सांगून जिल्ह्यात नवी काँग्रेस उभी करण्याचे आवाहनही केले.प्रास्ताविकात आनंदराव पाटील यांनी जिल्ह्यात पक्षाची बांधणी करूया. नवीन जिल्हाध्यक्षांना नेहमीच सहकार्य राहील. पुन्हा नव्याने जिल्ह्याला काँग्रेसचा बालेकिल्ला करूया, असे आवाहन केले.
आमदार जयकुमार गोरे यांनी तर अर्ध्या तासाच्या आपल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचा वारंवार समाचार घेतला. काँग्रेसने ज्यांना मोठे केले त्यांनीच प्रतारणा केली. तेव्हापासून काँग्रेस संघर्ष करत असल्याची खंत व्यक्त केली. तसेच एकत्र काम केले तर जिल्ह्यात आपण राष्ट्रवादीला पराभूत करू शकतो, हे आमदार मोहनराव कदम यांच्या विधान परिषद निवडणुकीत दाखवून दिले आहे. तोच आदर्श घेऊन पुढे जाऊया, असे आवाहन केले. लढाई कोणाशी आहे, हेच माहीत नाही. त्यामुळे हातात बंदुका घेऊन काय फायदा ? आता लढाईला सुरुवात होणार असून, ‘किसमे कितना है दम’ हे दाखवून देऊच, असे आव्हानही गोरे यांनी दिले.
जिल्हा परिषद निवडणुकीत आपले खूप नुकसान झाले. येथून पुढे गोरे आणि आनंदराव नाना गट सोडा. एकच पृथ्वीराज बाबांचे नेतृत्व मानून काम करूया. आगलाव्यांपासून दूर राहूया. आता नव्याने आघाडी होत आहे. त्यामध्ये काँग्रेसचे नुकसान होऊ नये. विधानसभेला जिल्ह्यातील अर्ध्या जागा हव्या आहेत, हीच भूमिका घ्यावी लागेल, असेही आमदार गोरे यांनी स्पष्ट केले.पद शोभेची बाहुली नाही...अध्यक्षपदाचे उचललेले धनुष्य खाली ठेवता येत नाही. ते पेलावेच लागेल, असे सांगून नूतन जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी भाषणाची सुरुवात केली. माझ्या कारकिर्दीत कोणी दुखावणार नाही, याची काळजी घेऊन पक्षाला गतवैभव प्राप्त करून देऊ . पद शोभेची बाहुली न ठेवता काही कटू निर्णय घेण्यात येतील. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या रक्षण आणि संरक्षणासाठी प्रसंगी संघर्षही करावा लागणार आहे. त्यासाठी सर्वांचेच सहकार्य असावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी धनश्री महाडिक, विराज शिंदे यांचेही भाषण झाले.