नसीर शिकलगार ल्ल फलटण
तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला भरभरून मतदान मिळालेच; पण सातारा जिल्ह्यातही विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची पूर्ण बहुमताने सत्ता आली. आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी रामराजेंचे बंधू संजीवराजे नाईक-निंबाळकर यांची निवड निश्चित होणार असल्याचे मानले जाते. सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनचा बालेकिल्ला मानला जातो. यावेळेस या किल्ल्याला मोठे भगदाड पडण्याची शक्यता व्यक्त होती. मात्र, राजकारणात तरबेज असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सातारा जिल्ह्याची सर्व सूत्रे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याकडे सोपविली. रामराजेंनी अत्यंत चाणाक्षपणे सर्व सूत्रे हाताळताना प्रतिकूल परिस्थितीतही विशेषत: भाजपामध्ये मोठे नेतेमंडळी जात असताना तसेच त्यांच्या जागा राखण्याच्या शक्यता असतानाही सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळवून दिले. भाजपाचा शिरकाव मोडीत काढलाच; पण राष्ट्रीय काँग्रेसचाही पाडाव केला. रामराजे हे शरद पवारांचे विश्वासू सहकारी ओळखले जातात. त्यामुळे रामराजेंचा शब्द शरद पवार कधी मोडीत नाहीत. राज्याच्या राजकारणात काम करताना त्यांचे बंधू संजीवराजे नाईक-निंबाळकर फलटण तालुक्याची धुरा सांभाळत असतात. रामराजे, संजीवराजे, रघुनाथराजे या तिघा बंधूंनी एकाचवेळी राजकारणात प्रवेश केला. रामराजे नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार, मंत्री ते विधान परिषदेचे अध्यक्ष झाले. संजीवराजे जिल्हा परिषद सदस्य, उपाध्यक्ष, फलटण पंचायत समितीचे सभापतीही झाले. संजीवराजेंना मोठे पद देण्याचा रामराजेंचा बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न होता. मात्र, साध्य होत नव्हते. आता जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुले झाल्याने या पदावर आता ज्येष्ठतेनुसार संजीवराजेंचे नाव पुढे येत आहे. संजीवराजे नाईक-निंबाळकर सलग सहाव्यांदा जिल्हा परिषदेमध्ये निवडून आले असून, त्यांच्या एवढा अनुभवी सदस्य कोणी नाही. त्यामुळे अग्रक्रमाने जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी त्यांचे नाव आघाडीवर आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारात रामराजे नाईक-निंबाळकर यांनी ‘जिल्हा परिषद व पंचायत समितीची सत्ता मोठ्या संख्येने द्या. तालुक्याला मी दुसरा लाल दिवा देतो,’ असा शब्द फलटण तालुक्यातील जनतेला दिला होता. मतमोजणीनंतर जिल्हा परिषदेच्या ७ पैकी ६ व पंचायत समितीच्या १४ पैकी १२ जागा राष्ट्रवादीला मिळाल्याने आता सर्वांच्या नजरा जिल्हा परिषद अध्यक्ष पदाकडे लागल्या आहेत. रामराजेंकडून ताकदीनिशी प्रयत्न फलटण तालुक्यातून माजी आमदार दिवंगत चिमणराव कदम यांनी १९७८ मध्ये त्यानंतर माणिकराव सोनवलकर यांनी २०१५-१६ मध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद बऱ्याच दिवसांनी खुले राहिल्याने आता जिल्हा परिषद अध्यक्ष पदावर संजीवराजेंची वर्णी लावण्यासाठी रामराजे आता सर्व ताकदीनिशी प्रयत्न करणार यात शंका नाही. निकालानंतर आता जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या चर्चेने तालुक्यात जोर धरला आहे.