शारीरिक संबंध हा प्रत्येक विवाहित कपलच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग असतो. लैंगिक जीवन आनंदी आणि समाधानी असेल तर दोघेही चांगले राहतात. पण काही कारणांनी लैंगिक जीवन विस्कळीत होऊन बसतं. आपल्याकडे अजूनही लैंगिक गरजा, लैंगिक सुख या विषयावर मोकळेपणाने बोललं जात नाही. त्यामुळे लैंगिक जीवनाची जी विस्कटलेली घडी आहे, ती तशीच राहू देऊन लोक पुढे जात राहतात. पण ती सोडवण्याचा प्रयत्न करत नाही. आज आम्ही तुम्हाला असे काही संकेत सांगणार आहोत ज्यावरून तुम्ही ओळखू शकता की, तुमच्या लैंगिक जीवनाची घडी विस्कटली आहे. तसेच त्याची काही कारणेही सांगत आहोत.
तुम्हालाही जर तुमच्या लैंगिक जीवनात कंटाळा आला असेल आणि या समस्येतून बाहेर पडायचं असेल तर काही गोष्टी नक्कीच करता येतील. सेक्सॉलॉजिस्ट Jess O'Reilly यांनी bustle.com या वेबसाईटला या समस्येची कारणे आणि त्यावरील उपाय सांगितले आहेत. चला जाणून घेऊ लैंगिक जीवनात कंटाळवाणा का आलाय त्याची कारणे....
१) एकच व्यक्ती नेहमी पुढाकार घेत असेल
लैंगिक जीवन हे दोघांचं असतं, त्यातून दोघांनाही आनंद मिळत असतो. पण नेहमी एकच व्यक्ती पुढाकार घेत असल्याने नाविन्यता काही राहत नाही. याने नेहमी पुढाकार घेणाऱ्या व्यक्तीला कंटाळा येऊ शकतो. त्याचा मूड खराब होऊ शकतो. पुरूष नेहमी पुढाकार घेत असतात. त्यांना वाटत असतं की, त्यांच्या पार्टनरने सुद्धा पुढाकार घ्यावा आणि परमोच्च आनंद मिळावा. त्यामुळे केवळ नेहमीच पुरूषांनीच पुढाकार घ्यावा असं काही नाही. वेगळेपणा टिकून रहावा, जास्त आनंद मिळावा यासाठी महिलांनीही कधी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
२) तुम्हाला काय हवंय ते कधी बोलला नाहीत
प्रत्येक व्यक्तीची आवड-निवड ही वेगळी असते. लैंगिक इच्छांबाबतही ही गोष्ट लागू पडते. जर तुम्ही एकमेकांना काय आवडतं, काय हवं हे बोलले नाही तर तुम्ही तुमच्या लैंगिक जीवनाचा पूर्ण आनंद कधीच घेऊ शकणार नाही. कारण जे हवं असतं ते तुम्हाला मिळत नसतं. अशात तुम्हाला बेडमध्ये काय हवंय हे पार्टनरसोबत मोकळेपणाने बोला. त्यांना आपोआप कळेल या गैरसमजात राहू नका.
३) रोज एकच एक पद्धत
जेव्हा कपल्सना कळतं की, बेडमध्ये काय केल्याने आनंद मिळतो, तेव्हा ते नवीन काही करण्याचा किंवा शोधण्याचा प्रयत्न सोडून देतात. त्यातून त्यांना खरंच किती आनंद मिळतो? मिळतो का? हे त्यांनाच माहीत असतं. पण हेही तितकंच खरं आहे की, रोज एकच एक पद्धत वापरली गेली तर काही दिवसांनी त्याचा कंटाळा नक्कीच येतो. त्यामुळे वेगळं काही करण्याचा प्रयत्न करा.
४) अॅक्टनंतर दोघेही शांत होता
शारीरिक संबंधाने तुम्हाला दोघांनाही जवळ आल्यासारखं वाटलं पाहिजे, दूर गेल्यासारखं नाही. जर शारीरिक संबंधानंतरही तुम्ही एकमेकांच्या जवळ आल्यासारखं वाटत नसेल तर नक्कीच वेगळं काही तरी आहे. काहीतरी समस्या असू शकते. त्यामुळे असं काही असेल तर वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
५) काही समस्यांवरून एकालाच दोष देणे
तुमच्या लैंगिक जीवनात काही समस्या असेल जसे की, ऑर्गॅज्मपर्यंत पोहचत नसाल, हवा तो आनंद मिळत नसेल, काही मनासारखं करता येत नसेल तर एकालाच दोष देऊ नका. अशावेळी चिडचिड करण्यापेक्षा नेमकी समस्या काय आहे, याचा विचार करा. एकाला दोष देण्यापेक्षा बोलून, चर्चा करून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.