मासिक पाळीबाबत लोकांमध्ये पूर्वीपासूनच वेगवेगळे गैरसमज आहेत. कधी मुलींना अशुद्ध मानून घराबाहेर ठेवलं जातं तर कधी त्यांना स्वयंपाक घरात येण्यासही रोखलं जातं. सोबतच आणखी एक गैरसमज म्हणजे मासिक पाळी दरम्यान शारीरिक संबंध ठेवण्याबाबतही आहे. म्हणजे मासिक पाळीदरम्यान शारीरिक संबंध ठेवावे की नाही? असा हा प्रश्न आहे. अनेकांना याबाबत अनेक गैरसमज आहेत. चला जाणून घेऊ याबाबत....
मासिक पाळी महिलांच्या शरीरात होणारी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. याचा संबंध प्रजनन तंत्राशी असतो. पण अनेकांना असंच वाटतं की, मासिक पाळी असताना शारीरिक संबंध ठेवणं चांगलं नसतं. पण मुळात ही धारणाच चुकीची आहे, असं तज्ज्ञ सांगतात. कारण वैज्ञानिक रूपाने असं कोणतही प्रमाण नाहीये की, मासिक पाळी असताना शारीरिक संबंध ठेवू नये. किंवा मासिक पाळी दरम्यान शारीरिक संबंध ठेवल्याने महिला किंवा पुरुषाला आरोग्यासंबंधी काही नुकसान होतं. पण हे गरजेचं आहे की, दोघांचीही सहमती हवी आणि आवश्यक ती काळजी घ्यावी.
अनेक लोकांना मासिक पाळीदरम्यान शारीरिक संबंध ठेवताना सहजता असते. याचं कारण हे आहे की, यावेळी महिलेच्या प्रजनन अंगात ओलावा असतो. अशात अनेकांना शारीरिक संबंध ठेवणं सहज आणि आनंददायी वाटतं.
मासिक पाळीदरम्यान अनेकदा महिलांना वेदना होत असतात. अशात शारीरिक संबंध ठेवले गेले तर त्यांना वेदनेतून आराम मिळू शकतो. याचं कारण ऑक्सिटोसिन, डोपामाइन हार्मोन्स आणि एंडोरफिंस हार्मोन्सचं प्रमाण वाढतं. यांचा प्रभाव पेनकिलर गोळ्यांपेक्षाही जास्त होतो.
अनेक महिलांची मासिक पाळीदरम्यान अधिक चिडचिड होते. अशात शारीरिक संबंध ठेवल्याने त्यांची चिडचिड कमी होऊ शकते. कारण यावेळी रिलीज होणाऱ्या हार्मोन्समुळे महिलांना आनंद मिळतो आणि त्यामुळे तणावही दूर होतो. इतकेच नाही तर हार्मोन्समध्ये बदल होत असल्याकारणाने काही महिलांना मासिक पाळीमध्येच शारीरिक संबंध ठेवण्याची तीव्र इच्छा होते. अशात त्यांना ऑर्गॅज्मचा अनुभव मिळण्याचीही दाट शक्यता असते.
तसेच मासिक पाळीदरम्यान शारीरिक संबंध ठेवल्याने गर्भधारणा होण्याची शक्यता कमी असते. पण तरी सुद्धा गर्भधारणेची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी कंडोमचा वापर केलेला कधीही चांगला. त्यासोबतच या दरम्यान शारीरिक संबंध ठेवल्यास स्वच्छतेचीही पूर्ण काळजी घेणे गरजेचे आहे. असे न केल्यास संक्रमण होण्याचाही धोका असतो.