(Image Credit : 959chfm.com)
जेव्हा विषय व्यक्तीच्या गरजांचा येतो तेव्हा त्यात लैंगिक जीवनाला फार महत्त्व दिलं जातं. तसं तर अजूनही आपल्या देशात शारीरिक संबंध किंवा लैंगिक जीवनाकडे लाजिरवाणी गोष्ट म्हणून पाहिलं जातं. किंवा यावर फार मोकळेपणाने बोलले जात नाही. पण तरी सुद्धा यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, लैंगिक जीवन हे केवळ आनंदी असून चालत नाही तर हेल्दी सुद्धा ठेवण्याचा प्रयत्न करा. लैंगिक जीवनाबाबत अनेक गैरसमज असल्या कारणाने अनेकांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे काही गोष्टींची काळजी घेणे फार महत्त्वाचे ठरते.
कीगल एक्सरसाइज
कीगल एक्सरसाइज ही हेल्दी लैंगिक जीवनासाठी महत्त्वाची मानली जाते. या एक्सरसाइजच्या माध्यमातून ओटीपोटाच्या भागात चांगला रक्तप्रवाह होतो. याने ओटीपोटाचा भाग आणि आजूबाजूच्या मांसपेशी मजबूत होतात. तसेच याने या भागाची संवेदनशीलताही वाढते. जर तुमचे मसल्स स्ट्रॉंग असतील तर उत्तेजना आणि ऑर्गॅज्मदरम्यान तुम्हाला अधिक आनंद मिळेल.
नियमित चेकअप
जर तुम्ही नियमितपणे हेल्थ चेकअप करत असाल तर मग लैंगिक जीवनाबाबत बेजबाबदारपणा का करायचा? हेल्दी लैंगिक जीवन कायम ठेवण्यासाठी आणि सोबतच इरेक्टाइल डिस्फंक्शन व त्रासदायक शारीरिक संबंध अशा समस्यांपासून बचाव करणे सुद्धा गरजेचे आहे. त्यामुळे याबाबतही नियमित चेकअप करावे.
प्रोटेक्शनचा वापर
तुमच्या लैंगिक क्रियेचा परिणाम काय होऊ शकतो, ही बाब लक्षात घेत योग्य प्रोटेक्शनचा वापर करा. नको असलेली गर्भधारणा सोबतच कोणत्याही प्रकारचं सेक्शुअल इन्फेक्शनपासून बचावासाठी योग्य त्या गोष्टींची काळजी घ्या. तसा तर प्रचलित गर्भनिरोधक म्हणून कंडोमचाच वापर करतात. पण मोठ्या संख्येत महिला गर्भनिरोधक टॅबलेटचाही वापर करतात. मात्र या टॅबलेटचे काही साइड इफेक्टही होतात.
आहार सुद्धा महत्त्वाचा
लैंगिक जीवन हेल्दी करण्यासाठी तुम्हाला नियमित पौष्टीक आहार घेणेही गरजेचे आहे. याने तुमची उत्तेजना वाढलेली राहील. फळं, भाज्या, ड्रायफ्रूट्स असे पदार्थ नियमित खावेत. याने तुमचं आरोग्यही चांगलं राहील आणि तुमचं लैंगिक जीवनही चांगलं राहील.
(टिप - आम्ही हे केवळ तुमच्यापर्यंत माहिती म्हणून पोहोचवत आहोत. तुम्हाला लैंगिक जीवनासंबंधी काहीही समस्या असेल तर वेळीच डॉक्टरांची भेट घ्यावी. जेणेकरून तुमची समस्या वाढणार नाही. आम्ही वरील गोष्टींनी तुमचं लैंगिक जीवन चांगलं होईल असा कोणताही दावा करत नाही.)