जगातल्या सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक आणि चीनच्या अलिबाब कंपनीचे संस्थापक जॅक मा यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातले ६ दिवस ६ वेळा शारीरिक संबंध ठेवण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की, 'कामाच्या बाबतीत मी ९९६(आठवड्यातले ६ दिवस सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत काम)वर जोर देतो, आणि आपल्या खाजगी आयुष्यात ६६९(६ दिवस ६ वेळा शारिरीक संबंध) वर जोर द्या'.
आता त्यांच्या या काम जीवनाच्या सल्ल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरायला वेळ लागला नाही आणि विषय इतका नाजूक असल्याने त्यावर चर्चा होणेही सहाजिकच आहे. पण त्यांच्या सल्ल्यावर अनेकांना वेगवेगळे प्रश्नही पडले आहेत. त्यातील एक प्रश्न म्हणजे, खरंच असं शक्य आहे का? यावर आम्ही तज्ज्ञांचं मत जाणून घेतलं.
सेक्सॉलॉजिस्ट डॉ. राजन भोसले यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की, 'मुळात हा प्रश्नच चुकीचा आहे. कारण कुणाच्या सल्ल्यावरून कोण काय, किती करणार हे कसं ठरेल? उदाहरणार्थ जेवण करताना आपण जेवढी भूक असेल तेवढंच जेवतो. तसंच शारीरिक संबंधाचं असतं. प्रत्येकाच्या गरजेनुसार, क्षमतेनुसार ते करतात'.
ते सांगतात की, 'बऱ्याचदा या गोष्टी परिस्थितीवर अवलंबून असतात. व्यक्तीच्या वयोमानावरही हे अवलंबून असतं. कुणाला काही आजार असेल तर काय करणार? मला वाटतं लोकांनी या प्रश्नाचं उत्तर स्वत:त शोधायला हवं. याचं खरं उत्तर डॉक्टर किंवा कुणीही देऊ शकत नाही. याचं उत्तर तुम्ही आणि तुमची जोडीदारच स्वत:ला देऊ शकतात. कुणी काय सांगतं यापेक्षा आपलं आपण ठरवायचं'.