बाळाच्या जन्मानंतर कपल्सना असं वाटत असतं की, त्यांचं लैंगिक जीवन संपतं. त्यामुळे ते सतत चिंतेत असतात. पण मुळात असं काही नसतं. डॉक्टरही सांगतात की, सामान्यपणे डिलेव्हरीनंतर सगळंकाही नॉर्मल होतं. त्यामुळे या गोष्टींची चिंता करणे चूक आहे. फक्त थोडी काळजी घेणे गरजेचे आहे.
शरीर बरं होऊ द्या
डिलेव्हरीनंतर महिलांचं शरीर पूर्णपणे पूर्ववत होण्यास जवळपास सहा आठवड्यांचा कालावधी लागतो. त्यानंतरच शारीरिक संबंध ठेवणे योग्य मानलं जातं. हा कालावधी निघून गेल्यावर वेळीच डॉक्टरांना भेटा आणि त्यांचा सल्ला घ्यावा.
घाई करू नका
महिलांमध्ये शारीरिक संबंधाची इच्छा कमी होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्यांच्या गुप्तांगात वेदना होणे आहे. डिलेव्हरीदरम्यान काही महिलांच्या गुप्तांगाला थोडं कापलं जातं. त्यावर टाके मारले जातात. अशात हे टाके पूर्णपणे भरेपर्यंत वेदना होत राहतात. त्यामुळे घाई अजिबात करू नका.
बर्थ कंट्रोलचं करा प्लॅनिंग
जर तुमची नुकतीच डिलेव्हरी झाली असेल तर अशात लगेच पुन्हा गरोदर होणं शहाणपणाचं नसेल. अजूनही तुमची मासिक पाळी व्यवस्थित सुरू झालेली नाहीये. त्यामुळे पुन्हा गर्भधारणा होऊ देणे धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे पूर्ण काळजी घ्यावी.
लुब्रिकंटचा करा वापर
अनेकदा डिलेव्हरीनंतर काही महिलांच्या गुप्तांगामध्ये नैसर्गिक ओलावा राहत नाही. त्यामुळे काही महिला शारीरिक संबंधाला नकार देतात. असं वेगवेगळ्या औषधांमुळेही होतं. अशावेळी त्यांच्यावर शारीरिक संबंधासाठी दबाव टाकणे योग्य ठरणार नाही. जर लिक्विड लुब्रिकंटने वेदना होत नसतील तर याचा वापर करू शकता. पण तोही डॉक्टरांच्या सल्ल्याने केला तर अधिक बरं होईल.
एकत्र वेळ घालवा
शारीरिक संबंध ही केवळ शारीरिक क्रिया नाहीये. तर यात भावनांचाही तितकाच महत्त्वाचा मुद्दा असतो. त्यामुळे डिलेव्हरीनंतर शारीरिक संबंध सुरू करण्यापूर्वी एकमेकांसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करा. डिलेव्हरीनंतर अनेकदा महिला या डिप्रेशनमधून जात असतात त्यामुळे त्यांच्याशी बोला, त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवा. याने दोघेही भावनिकदृष्ट्या चांगले जवळ याल.
डॉक्टरांचा सल्ला
जर फीमेल पार्टनरच्या मनात बरेच दिवस उलटून गेल्यावरही भीती असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. कधी कधी ही भीती वेदनांमुळे निर्माण होते तर कधी काही वेगळी कारणे असतात. अशावेळी डॉक्टरच काय तो योग्य सल्ला देऊ शकतात.