शारीरिक संबंध विवाहित लोकांच्या जीवनाचा महत्त्वाचा आधार असतो. सर्वांनाच वाटत असतं की, त्यांचं लैंगिक जीवन चांगलं आणि आनंदी असावं. यासाठी काही लोक रोज त्याच त्याच गोष्टी न करता काही वेगळंही ट्राय करत असणार. पण काही लोक शारीरिक संबंधाबाबत इतके झपाटलेले असतात की, त्यांना याचं अॅडिक्शन म्हणजेच सवय लागते. सेक्स अॅडिक्शन हा शब्द तुम्ही अनेकदा ऐकला असेल. पण हे नेमकं काय असतं किंवा किती नुकसानकारक असतं हे जाणून घ्यायला हवं.
अनेकदा असं ऐकायला मिळतं की, काही ठराविक लोकांमध्येच सेक्स अॅडिक्शन बघायला मिळतं. तर काही लोकांना असाही प्रश्न पडतो की, सेक्श अॅडिक्शन कुणाला होऊ शकतं. पण मुळात असं काही नसतं. कोणत्याही प्रकारच्या सवयी लागणाऱ्या कोणत्याही लोकांना ही सवय लागू शकते. पण मुळात सवय लागणे म्हणजे काय हेही आधी समजून घ्यायला हवं.
नेमकी काय असते ही समस्या?
सेक्सॉलॉजिस्ट डॉ. राजन भोसले यांनी याबाबत सांगितले की, 'काही लोकांचा शारीरिक संबंधाबाबतचा खासप्रकारचा आग्रह असतो. त्यांचा हा आग्रह जेव्हा पूर्ण होत नाही किंवा त्यांची या संदर्भातील इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा ते अस्वस्थ होतात. पण सवय म्हणजे काय तर या गोष्टीमुळे जर त्या व्यक्तीचं दैनंदिन जीवन विस्कळीत होत असेल, त्याच्या दैनंदिन जीवनावर याचा वाईट परिणाम होत असेल, त्याच्या नात्यांवर परिणाम होत असेल, त्याच्या कामावर या वाईट परिणाम होत असेल तेव्हा याला आम्ही सेक्स अॅडिक्शन म्हणतो.
एखाद्या व्यक्तीला हस्तमैथूनाचं अॅडिक्शन असू शकतं. हस्तमैथून करणे वाईटही नाही. पण ते अॅडिक्शन कधी ठरतं जेव्हा त्याचा त्याच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होत असेल तेव्हा. म्हणजे त्याच्या हस्तमैथूनाच्या सवयीमुळे त्याचं अभ्यासात लक्ष लागत नसेल, त्यांच्या जीवनावर त्याचा परिणाम होत असेल तेव्हा.
काय करावे उपाय?
डॉ. भोसले म्हणाले की, 'अशाप्रकारची समस्या झाली तर इतर कुणाशी चर्चा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा वेळीच डॉक्टरांची मदत घेणे कधीही चांगले ठरते. खरंच तुम्हाला अडिक्शन आहे की आणखी काही समस्या आहे. हे जाणून घेऊन डॉक्टर योग्य ते उपचार करू शकतील. त्यामुळे कुणालाही असं वाटत असेल की, ते यात अडकत चालले आहेत. त्यांनी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा'.