(Image Credit : midliferocksblog.com)
वैवाहिक जीवनात शारीरिक संबंध ठेवताना दोन व्यक्ती पूर्णपणे एकमेकांवर विश्वास ठेवत असतात. पण अनेकदा असं होतं की, यादरम्यान काही गोष्टींबाबत दोघांपैकी एक व्यक्ती सहज नसते. मात्र या गोष्टींकडे दुर्लक्ष करुन चालत नाही. कारण यामुळे नात्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे दोन्ही व्यक्तींनी याबाबत मोकळेपणाने संवाद साधावा. अशात काय बोलावे असा प्रश्न पडत असेल तर आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगत आहोत, ज्यांच्यावर तुम्ही मोकळेपणाने संवाद करायला हवा.
सहजता
प्रत्येकाचीच लैंगिक गरज वेगवेगळी असते. प्रत्येकाची याबाबतची आवड-निवड वेगळी असते. याचाच अर्थ एकाला आवडणारी गोष्ट दुसऱ्या व्यक्तीलाही आवडेलच. अशात जर तुम्ही एखाद्या गोष्टीमुळे सहज होत नसाल किंवा तुम्हाला अडचण होत असेल तर याबाबत मोकळेपणाने दोघांनीही बोलायला हवे. संवाद साधाल तरच तुमची अडचण दूर होऊ शकते.
सुरक्षितता
भलेही तुमचं लग्न झालेलं असेल तरीही सुरक्षित शारीरिक संबंध ठेवण्याची काळजी घ्यावी. याने तुम्ही लैंगिक विकाराच्या विळख्यात अडकणार नाहीत. हा असा विषय आहे, ज्याकडे तुम्ही भावनिक होऊन दुर्लक्ष करु शकत नाहीत. त्यामुळे यावरही संवाद व्हायला हवा.
बेधडक नाही म्हणा....
एखादा दिवस असाही असतो की, काही करण्याची इच्छा होत नाही. एकाला काही करायचं असेल तर दुसऱ्याला कदाचित करायचं नसेल असंही असू शकतं. त्यामुळे एकाने दुसऱ्याला शारीरिक संबंधासाठी जबरदस्ती करणे योग्य नाही. याने दोघांनाही आनंद मिळणार नाही. दोघांपैकी एकाला जर काही त्रास होत असेल तर बेधडकपणे किंवा न घाबरता तो व्यक्त करावा. जेव्हा दोघांचीही सहमती असेल तेव्हाच पुढे जावे.
लैंगिक आरोग्य
लैंगिक आरोग्य चांगलं ठेवणं फार महत्त्वाची बाब आहे. याबाबतही जोडीदारांनी आपसात संवाद करणे गरजेचे आहे. याबाबत लाजून काहीही उपयोग होणार नाही. या विषयावर दुर्लक्ष करणं तुम्हाला महागात पडू शकतं. खासकरुन महिलांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अशावेळी जोडीदाराशी बोलून नंतर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.