सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात आरोग्य उपकेंद्र उभारण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्यामुळे तब्बल १ कोटी २६ लाख रूपये एवढा निधी शासनास परत करावा लागणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य समिती सभेत उघड झाली. उपकेंद्र उभारणीसाठी जागा शोधण्यास आरोग्य विभाग अपयशी ठरण्याचा फटका निधीला बसला आहे.दरम्यान, जिल्हा परिषदेच्या शाळांमधील रिकामे वर्ग, परिसरातील जागांवर उपकेंद्र सुरू करण्याविषयी जागा उपलब्धता अहवाल सादर करण्याचे आदेश सभापती गुरूनाथ पेडणेकर यांनी दिले. याबाबत समिती सदस्य संग्राम प्रभूगावकर यांनी सूचना मांडली. जिल्हा परिषद आरोग्य समितीची सभा सभापती गुरूनाथ पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी येथील बॅ. नाथ पै सभागृहात झाली. यावेळी समिती सदस्य प्रमोद कामत, संग्राम प्रभूदेसाई, निकिता जाधव, नम्रता हरदास, समिती सचिव डॉ. अनिरूद्ध आठले, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.सिंधुदुर्गातील आरोग्य उपकेंद्र बांधकामासाठी सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात कोट्यवधी रूपयांचा निधी उपलब्ध झाला होता. त्यापैकी लाखो रूपये यावर खर्च झाले. सन २०१३-१४ चा अखर्चित निधी सन २०१४-१५ वर्षात खर्च करणे बंधनकारक होते. मात्र, तसे न झाल्याने तब्बल सव्वा कोटी रूपये निधी शासनास परत करण्याची नामुष्की आरोग्य विभागावर ओढवणार आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यात ५ डॉक्टर केवळ हजर होऊन कुणालाही न सांगता माघारी निघून गेले. तर ७ अधिकारी पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षण घेत आहेत. तर २० ठिकाणी अधिकारीच नाहीत. राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी जिल्ह्याला रिक्त डॉक्टरांची पदे भरली जातील, असे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले? रिक्त पदांवर डॉक्टर उपलब्ध होईपर्यंत सध्या कार्यरत असणाऱ्या १७ डॉक्टरांना मुदतवाढ देण्याचा ठराव घ्यावा.- संग्राम प्रभूगावकर,जिल्हा परिषद सदस्यआशांना मिळणार ‘दिवाळी’ भेटमानधन तत्त्वावर काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांना दिवाळीनिमित्त २ हजार रूपये दिवाळी भेट मिळावी, अशी मागणी संघटनेमार्फत करण्यात येत होती. त्यानुसार जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी ५०० रूपये दिवाळी भेट देण्याचे जाहीर केले होते. या प्रस्तावाला आजच्या आरोग्य समिती सभेने मान्यता दिली.आरोग्य विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या १ हजार १३५ पाणी नमुन्यांपैकी १७५ पाणी नमुने म्हणजेच १० टक्के पाणी नमुने दूषित आढळले होते. यात कणकवली व वैभववाडी तालुक्यातील पाणी नमुने जास्त दूषित आढळले होते. त्यानंतर वरील सर्व दूषित पाणी स्त्रोत शुद्ध करण्यात आले आहेत.
‘आरोग्या’चा १ कोटी निधी परत जाणार
By admin | Published: March 25, 2015 10:13 PM