सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद कार्यक्रम बंद करण्यात आलेला नाही. कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सामावून घेण्यात आले आहे. तसेच या अभियानाला आणि महिला अधिक सक्षम करण्यासाठी उमेद अंतर्गत १०० कोटींची बँक उभारणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मोर्चातील महिलांना मार्गदर्शन करताना दिली.उमेद अभियानातील महिलांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारी राज्यभर आंदोलन छेडले. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावरही मूक मोर्चा काढला. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यावर मोर्चाच्या शिष्टमंडळासोबत पालकमंत्री सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात चर्चा केली. यावेळी या महिलांच्या विविध मागण्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.
यावेळी वर्षा मडगावकर, सोनाली मेस्त्री, शिवानी परब, सुप्रिया परब, समिधा परब, रिया परुळेकर आदी महिला उपस्थित होत्या. ही चर्चा झाल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत स्वत: जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर असलेल्या महिलांपर्यंत पोहोचले. ते म्हणाले, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान शासनाने बंद केलेले नाही. ते अविरत सुरूच राहणार आहे. शासनाने कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर सामावून घेतले आहे.सरकारचे टाळ्या वाजवून आभारजिल्ह्यातील १२३ कर्मचारी पुन्हा सेवेत रुजू करून घेतले आहेत. त्यामुळे आपण महिलांनी ज्या मागण्यांसाठी आज मोर्चा काढला त्या सर्व मागण्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने मान्य केल्या आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने हे अभियान आणि महिला यांना अधिक सक्षम करण्यासाठी १०० कोटी रुपयांची बँक उभारणार असल्याचे जाहीर केले असल्याची माहिती यावेळी पालकमंत्र्यांनी दिली. यावेळी या महिलांनी पालकमंत्री व राज्य सरकारचे टाळ्या वाजवून आभार मानले.